अन्यायाविरोधात अविरत लढणारा लढवय्या नेत्याचा मानवी हक्काचा प्रेरणादायी लढा
उस्मानाबाद दि.०१: विवेक पंडित या एका नावात मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या विविधांगी लढायांचा प्रदीर्घ इतिहास लपलेला आहे. आज त्याचा प्रत्येय उस्मानाबाद न्यायालयात पाहायला मिळाला १९९३ साली राजाभाऊ लोंढे या दलित तरुणाच्या अंधश्रद्धा आणि जातीयवादातून झालेल्या हत्येला श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी वाचा फोडली होती. हे गंभीर प्रकरण दडपू पाहणाऱ्या तात्कालीन पोलीस यंत्रणेला आव्हान देत पंडित यांनी न्यायालयात धाव घेत हत्येचा गुन्हा दाखल करून घेतला होता. आज तब्बल सव्वीस वर्षानंतर या केसची नियमित सुनावणी सुरू झाली. आज विवेक पंडित यांची साक्ष उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयात झाली. सव्वीस वर्षानंतर न्यायाची दीर्घ लढाई पुन्हा सुरू झाल्याची हृदयस्पर्शी प्रतिक्रिया पंडित यांनी यावेळी व्यक्त केली.
राजाभाऊ लोंढे या दलित तरूणाला उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील जवळाखुर्द येथे विहिरीला पाणी लागावे म्हणून २२ एप्रिल १९९३ रोजी बळी देण्यात आले होते. पोलिसांनी ‘राजाभाऊ हा नाग नाग ओरडून मयत झाला’ असा बनाव तयार केला. तसा पंचनामा केला.शव विच्छेदनात तसेच मृत्युचे कारण दिले. एम्एस्इबी अभियंत्याने वीज नसल्याचा खोटा दाखला दिला.
या घटनेची माहिती मिळताच विवेक पंडित यांनी याठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. त्यानंतर पोलिस महासंचालकांना तपास नागरि हक्क संरक्षणकक्षा कडे देण्याची विनंती २१ मे १९९३ केली. ती मान्य करून नागरी हक्क संरक्षण कक्षाने आयपीसी ३०२ नुसार गुन्हा दाखल केला.
राजकिय दडपण आणुन पुन्हा हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे कडे वर्ग केला. त्यांनी ३०२ ऐवजी ३०४ नुसार दाखल आणि केवळ जमिन मालकावर दोषारोप ठेवला आणि सर्व अधिकार्यांना मुक्त केले.
यानंतर पंडित यांनी खाजगी केस सीआरपीसी २९९ नुसार कळंब न्यायालयात दाखल केली .साक्षी पुरावे स्वतः पंडित यांनी दिले. १९९७ साली हा खटला सत्र न्यायालयात पाठवण्यात आला.
अखेर २६ वर्षानंतर आजपासून त्याची नियमित सुनावणी सुरू झाली. प्रथम विवेक पंडित यांची साक्ष न्या.ए.ए. औटी यांनी घेतली. उलट तपासणी आरोपींच्या चार वकिलांनी घेतली. या खटल्यात ४ पोलिस अधिकारी, १ वैद्यकीय अधिकारी, २ एम् एस ईबी इंजिनियर यांसह १० आरोपी व ३० साक्षीदार आहेत. एक आरोपी पोलिस अधिकारी व पंडित यांचे दोन साक्षीदार मयत आहेत.
पंडित यांनी यापूर्वी देशात आणि राज्यातील अनेक भागांमध्ये जाऊन दलित मागासवर्गीय आणि विशेष म्हणजे मराठा समाजातील शेतकऱ्यांच्यावर होणाऱ्या अन्यायावर त्या त्या ठिकाणी जाऊन आवाज उठवला आहे आणि न्याय मिळवला आहे. आजच्या या सुनवणीने पुन्हा एकदा विवेक पंडित यांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याच्या भूमिकेची धार अजूनही तितकीच तीक्ष्ण असल्याची प्रचिती आली.
सध्या पंडित यांची प्रकृती तितकीशी ठीक नाही, दूरचा प्रवास टाळण्याचा डॉक्टरांचा सल्ला असताना आजच्या या सुनावणीला पंडित स्वतः उस्मानाबादला गेले. सोबत श्रमजीवी संघटनेचे अशोक सापटे,गौतम पाटील,विशाल बासू इत्यादी कार्यकर्ते होते.