-
सातत्य आणि संयमाचे फळ
पाचोरा(ज्ञानेश्वर धोंडू पाटील) दि.०१: शेतीमध्ये प्रामाणिकपणे संयमाने कष्ट केल्यास परिश्रमाला यशाची मधुर फळे नक्की लागतात असे उदाहरण पाचोरा तालुक्यातील सातगाव ता. पाचोरा येथील शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. यावर्षी सर्वत्र दुष्काळाचे वातावरण असताना अशोक सुकदेव पाटील यानी पाच एकरात अद्रक पिकातून लाखो रुपयांचे भरघोस उत्पन्न घेतले आहे. त्यांच्या अद्रक शेतीची परिसरात सर्वत्र चर्चा होत असून शेतामध्ये कष्ट करत असताना निराश न होता आशावादी राहिल्यास केलेल्या कष्टाला एक ना एक दिवस यश मिळत असल्याचे या आदर्श शेतकऱ्याचे मत आहे. अशोक पाटील यांची सातगाव शिवारात 37 एकर शेती असून यावर्षी त्यांनी पाच एकरात अद्रक 6 एकरावर हळद दहा एकरावर मका आणि उर्वरित पंधरा एकरावर कापूस पिकाची लागवड केली होती.
अशोक पाटील इतर पिकांबरोबर मागील सात ते आठ वर्षापासून अद्रक ची शेती करत आहेत विशेष म्हणजे मागील तीन वर्ष सातत्याने अद्रक ची शेती परवडत नसताना ही त्यांनी हार न मानता यावर्षी देखील पाच एकर क्षेत्रावर 50 क्विंटल अद्रक चे बियाणे लागवड केली जून महिन्यात शेतीची नांगरणी उत्तम मशागत करून साडे चार फुटावर गादी वाफा उभारणी केली. त्यामध्ये शेणखत व रासायनिक खत मिसळून योग्य पद्धतीने ठिबकवर आद्रकची लागवड केली. विशेष म्हणजे पाटील यांनी लागवडीसाठी लागणारे अद्रक चे बियाणे स्वतःच तयार केले होते. त्यामुळे लागवडीसाठी येणाऱ्या मोठ्या खर्चाची बचत झाली होती. यानंतर पिकाच्या उत्तम वाढीसाठी आवश्यकतेनुसार खते, सुक्ष्म अन्नद्रव्य आणि फवारणीचा योग्य वापर केल्याने अद्रकाची जोरदार वाढ झाली आहे. सुमारे नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर पीक काढणीला आले असून या शेतातून त्यांना 400 क्विंटल उत्पादनाची खात्री आहे सध्या स्थितीला अद्रकला बाजारात प्रति क्विंटल सहा हजाराचे भाव असून यामधून त्यांना 24 लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे बियाण्याचा खर्च वगळता पाटील यांनी अद्रक पिकाच्या मशागतीसाठी दीड लाख रुपये खर्च केलेला असून यावर्षी अद्रक ला उत्तम बाजारभाव असल्याने त्यांना भरघोस उत्पादन हाती येत आहे. याशिवाय सहा एकरातील हळद पिकातून देखील सुमारे बाराशे क्विंटल हळदीचे उत्पादन अपेक्षित आहे.कापूस आणि मका पिकाचे सरसरी साधारण उत्पन्न आल्याने पाटील समाधानी आहेत . अशोक पाटील यांचा एक मुलगा शिक्षकाची नोकरी करत असून दुसरा मुलगा सागर त्यांना शेतावर उत्तम प्रकारची साथ देतो .सागर पदवीधर असून देखील शेतामध्ये एकाग्रतेने काम करत असल्याने या कुटुंबाने यशस्वी शेतीचा परिपाठ घालून दिला आहे.