बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

जयदत्त आण्णा शुक्रवारी घेणार का 'या' पक्ष प्रवेशाचा निर्णय ?

बीड : ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर बीड मध्ये राजकीय भूकंप होईल का ?,'ते' भाजपा प्रवेशाच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न जिल्ह्यातील मतदार जनतेला पडला आहे. मागील काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपासून दुरावलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे येत्या शुक्रवारी आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. ५ एप्रिल रोजी क्षीरसागरांनी समर्थकांची व्यापक बैठक आयोजित केली असून या बैठकीत त्यांची यापुढील राजकीय वाटचाल निश्चित होणार आहे. क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे बीड जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागुन आहे.

बीड जिल्ह्यातील राजकारणात कायमच आपला दबदबा ठेऊन असलेले जयदत्त क्षीरसागर म्हणजे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे नेतृत्व आहे. अखिल भारतीय तैलिक महासभेच्या माध्यमातून ते देशभरातील तेली समाजाचे नेते म्हणून पुढे आलेले आहेत. जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप घडविण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा बीड जिल्ह्यात सर्व जागांवर भाजपने झेंडा फडकवला, मात्र एकमेव जयदत्त क्षीरसागर हे आपला गड राखण्यात यशस्वी ठरले होते. त्यानंतर दोन वर्षांनीच एकेकाळी राष्ट्रवादीतील वजनदार नेते असणारे जयदत्त क्षीरसागर अंतर्गत गटबाजीमुळे पक्षापासून दुरावले. त्यांच्या नाराजीची उघडपणे चर्चा होऊ लागली. मात्र, मागील वर्षाच्या अखेरीस बीड येथे शरद पवारांच्या सभेत त्यांनी हजेरी लावल्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली असावी असा अंदाज बांधण्यात येऊ लागला होता परंतु, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात परळी येथे राष्ट्रवादीच्या निर्धार यात्रेच्या समारोपाकडे त्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली होती. त्यावेळेस पासूनच क्षीरसागर वेगळी राजकीय भूमिका घेणार अशी चर्चा होऊ लागली. सध्या देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना क्षीरसागर मात्र अद्यापपर्यंत शांत असल्यामुळे त्यांच्या समर्थकांतही अस्वस्थतेचे वातावरण होते. त्यामुळे त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट करावी असा आग्रह समर्थकांनी धरला होता. अखेर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आ.जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी ५ एप्रिल रोजी आशीर्वाद लॉन्स येथे जिल्हाभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजीत केला आहे. या मेळाव्यात आ.जयदत्त क्षीरसागर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत व याच वेळी आपली भूमिका मांडणार आहेत.आ.जयदत्त क्षीरसागर कोणामागे आपली राजकीय ताकद लावणार आहेत याबद्दल जिल्ह्यात उत्सुकता लागली आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.