आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.०२: शिक्षण क्षेत्रात झालेले अमुलाग्र बदल व बदललेली अध्यापन पद्धती याचा ध्यास अनेक शिक्षकांनी घेतलेला आहे. प्रगत शैक्षणीक महाराष्ट्राचा तसेच गुणवत्तेचा ध्यास जोपासणाऱ्या या शिक्षकांनी अनेक नविन संकल्पना शिक्षण क्षेत्रात निर्माण केल्या आहेत.
अशाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामठी केंद्र फर्दापूर ता. सोयगाव जि. औरंगाबाद येथील शाळेतील उपक्रमशिल शिक्षक विजय जाधव हे विद्यार्थ्यांना बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातुन शिक्षणाचे धडे देत आहेत.
या आधी विजय जाधव हे नांदेड मधील हिमायतनगर सारख्या मागास व आदिवासी भागात डोंगर पाडयावर अध्यापनाचे कार्य करीत होते. तेथे चांगले शैक्षणिक कार्य केल्यामुळे राज्यस्तरीय उपक्रमशिल शिक्षक म्हणून “शिक्षण वारी” २०१६-१७ मधे स्टॉलधारक म्हणून निवड झाली होती.
पारंपारीक, रटाळ तसेच निरस अध्यापन पद्धतीला विद्यार्थि कंटाळतात. बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून अध्ययन अध्यापन प्रक्रिया मनोरंजक होते. हसत खेळत सर्वच विषयाचे अध्यापण बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून करता येते.मराठी, गणित, इंग्रजी, परीसर अभ्यास हे विषय नाट्यीकरणाच्या रूपाने ते शिकवितात.विद्यार्थ्यांच्या आवडीचे पात्र त्यांना देवून पाठ्य घटक शिकवितात म्हणून ते कायमस्वरूपी लक्षात राहतात. शिवाय याच बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातुन पर्यावरण संवर्धन, ग्लोबल वार्मिंग, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाव बेटी पढाव या विषयाचेही ते जनजागृती करतात. यासाठी त्यांना मुख्याध्यापक एम.सी.पाटील सर, केंद्रप्रमुख अण्णा पोळ,गटशिक्षणाधिकारी मा. दोतोंडे साहेब यांचे सहकार्य लाभले.