घोसला,दि.१२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सात वर्षापासून कोट्यावधी रु खर्चून उभारलेले घोसला ता.सोयगाव येथील आरोग्य उपकेंद्रातील रुग्णाचा बेड चक्क कुजक्या अवस्थेत आढळून आल्याने सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे .या आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज उभारलेली टुमदार इमारत मात्र सात वर्षापासून ताबा घेण्याच्या कारणावरून धूळखात पडून असल्याने या आरोग्य उपकेंद्रात थेट रुग्णाचे बेड कुजले असतांनाही अद्यापही आरोग्य आणि तालुकाप्रशासानाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
घोसला ता.सोयगाव येथे सात वर्षापासून आरोग्य उपकेंद्रासाठी कोट्यावधी रु खर्चून इमारत उभारण्यात आली होती.मात्र उभारलेल्या या इमारतीचा ताबा अद्यापही संबंधित ठेकेदाराने आरोग्य विभागाला दिलेला नसल्याची माहिती हाती आलेली असून घोसला येथील आरोग्य उपकेंद्राचा कारभार इमारती अभावी कागदोपत्रीच सुरु असल्याची खळबळजनक माहिती हाती आलेली आहे.सात वर्षापासून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम निधीतून टुमदार इमारत उभारली आहे.परंतु शासनाच्या ताबा घेण्याच्या वादावरून या इमारतीची जागेवरच माती झाली आहे.तरीही ताबा घेण्यासाठी प्रशासन पुढे येत नसून संबंधित ठेकेदार ताबा देण्याची अडकाठी सोडत नसल्याचे कळाले आहे.घोसला गावाच्या बाजूलाच सात वर्षापासून धूळखात उभ्या असलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीत वर्षभरापूर्वी आरोग्य विभागाने रुग्णाच्या सेवेसाठी बेड आणले होते परंतु ताबा दिल्याच्या कारणावरून या इमारतीत कारभारच सुरु न झाल्याने या इमारती मधील बेड अक्षरशः कुजले असून इमारतीची दुरवस्था होवून नव्याने बांधलेली इमारात वापरा विनाच मोडकळीस आल्याची स्थिती या आरोग्य उपकेंद्राची झालेली आहे.त्यामुळे या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या बांधकामासाठी खर्च झालेल्या निधीवर पाणी सोडण्यात आलेले आहे.
इमारतीची दुरवस्था ,दरवाजे खिडक्या तोडल्या–
घोसला येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत धूळखात उभी असून या इमारतीच्या तावदाने,दरवाजे आणि खिडक्यांची अज्ञातांनी तोडफोड केली असून इमारत वापराच्या आधीच मातीत गेली असून नव्याने दुरुस्तीवर आलेली आहे.ठेकेदार आणि प्रशासनातील ताबा घेण्याच्या वादावर सात वर्षात तोडगाच निघालेला नसल्याने शासनाच्या या निधीला बुडत खात्याची कात्री लागलेली आहे.
आरोग्य केंद्राचे कामकाज कागदोपत्रीच–
घोसला आरोग्य उपकेंद्राचे कामकाज मात्र इमारत उभी राहिल्यापासून वास्तू ताब्यात न मिळाल्याने अखेरीस या उपकेंद्राचे कामकाज कागदोपत्रीच दाखविण्यात आलेले आहे.त्यामुळे रुग्णांना रुग्णसेवा तर दूरच परंतु या इमारतीत कधीही रुग्ण व आरोग्य कर्मचारी आढळून आलेले नाही असे ग्रामस्थ सांगतात त्यामुळे घोसला आरोग्य उपकेंद्रावर होणारा आरोग्याचा खर्च जातो कुठे असाही प्रश्न पडला आहे.