आपले ठेवायचे झाकून लोकांचे पहायचे वाकून हे थांबवा
धानोरा-फुंडी-पिंपळगाव दाणी-विहीरा-घोंगडेवाडी रस्त्याचे काम कोणाचे पाप?
शिरुर दि.०२: लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पालकमंत्र्यावर आरोप करताना विचार करावा.आष्टी तालुक्यातील ज्या आठ कोटी रुपयांचे टेंडर बजरंग सोनवणे यांना मिळाले होते त्या रस्त्याची अवस्था पहा.रस्त्याचे काम अर्धवट ठेवून बोगस बिले उचलण्याचे काम केले आहे.त्यांना सत्ताधारी लोकांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत आपले ठेवायचे झाकून आणि लोकांचे पहायचे वाकून असा टोला आमदार भिमराव धोंडे यांनी मानूर येथील कॉर्नर बैठकीत लगावला आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की,बजरंग सोनवणे ज्या कारखान्याच्या विषयावर बोलून पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या वर निशाणा साधत आहे,ते पूर्ण चुकीचे आहे.सोनवणे यांचा कारखाना नवीन असल्यामुळे शासनाकडून मोठ्या प्रमाणावर त्याला सवलती मिळत आहेत.ज्या कारखान्याला अजून दहा वर्षे पूर्ण झाली नाही तो कारखाना चालविणारांनी ऊसतोड मजुरांचे प्रश्न सोडविणाऱ्यांवर बेताल आरोप करू नयेत.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बजरंग सोनवणे यांनी आष्टी तालुक्यातील ज्या सात-आठ गावांना रस्ता करण्याचे टेंडर घेतले होते.ते काम जाऊन पहा म्हणजे लक्षात येईल.अजूनही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसून बजरंग सोनवणे यांचे आरोप म्हणजे आपले ठेवायचे झाकून आणि लोकांचे पहायचे वाकून असला प्रकार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सुंस्कृत आणि अभ्यासू खासदार प्रितमताई यांना त्यांच्या संकल्पनेतील भविष्यात होणारे विमानतळ पूर्ण करण्यासाठी मत द्यायचे असल्याचे त्यांनी आवाहन केले.रामकृष्ण बांगर यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले की,दुसऱ्याला खोटे ठरविणारे हे स्वताच खोटे बोलत असून अगोदर त्यांनी स्वताच्या पाटोद्यात काय विकास केला ते सांगावे. तालुक्यातील अनेक गावांत भिमराव धोंडे यांनी भाजपा उमेदवार प्रितम मुंडे यांच्या प्रचारानिमित्त कॉर्नर बैठका आणि नागरिकांना भेटून त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला.