मुंबई : १७ व्या लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल काही दिवस झाले असतानाच आणि काही जागेवर तर प्रचार देखील जोरात सुरू असताना केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टीचे ईशान्य मुंबईतील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करण्यात आला असल्याची माहिती राजकिय सूत्रांकडून समजते आहे.
भारतीय जनता पार्टीने मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेवरील टीका सोमय्यांना भोवल्याचे चित्र समोर येत आहे.
मुंबई भाजपचे मुलुंड मधील विद्यमान नगरसेवक मनोज कोटक यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना भारतीय जनता पक्षाने दिल्या होत्या. त्यामुळे किरीट सोमय्या यांची संधी हुकणार असल्याचे जवळपास निश्चित मानल जात होत. मुंबई महापालिका निवडणुकाच्या वेळी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेली टीका त्यांना भोवल्याचे म्हटले जात आहे.
मनोज कोटक दोन दिवसापासून ईशान्य मुंबईतील भाजप कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर कोटक यांच्याशिवाय ईशान्य मुंबईतून भाजपातर्फे पराग शाह, प्रकाश मेहता आणि प्रविण छेडा यांची नावे देखील चर्चेत होती.