बीड:आठवडा विशेष टीम– अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर रेल्वे मास्तरने सलग २४ तास ड्युटी केली. मध्यरात्री ड्युटीवर असतानाच त्यांना र्हदयविकाराचा तिव्र झटका आला. बसल्या ठिकाणीच खुर्चीवर त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सिग्नल न मिळाल्याने दोन रेल्वे सुमारे तीन तास परळी आणि पानगावच्या रेल्वे स्थानकातच अडकून पडल्या होत्या. हि घटना आज सोमवार दि.२८ रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
मुसाफिरसिंह (वय ४४, रा.बिहार) असे र्हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या स्टेशन मास्तराचे नाव आहे. परळी ते हैद्राबाद या रेल्वेमार्गावरील घाटनांदूर रेल्वे स्थानकात ते स्टेशन मास्तर म्हणून कर्तव्यावर होते. रविवार दि.२७ सकाळी १२ तासाच्या ड्युटीसाठी स्थानकात रुजू झाले होते. रात्रपाळीच्या ड्युटीवर असणारे स्टेशन मास्तर प्रशिक्षणासाठी गेल्यामुळे मुसाफिर यांना त्यापुढील सलग ड्युटी करण्यासाठी स्थानकातच थांबावे लागले. सोमवारी पहाटेच्यावेळेस मुसाफिरसिंह यांचे बसल्या जागीच खुर्चीवर निधन झाले. त्यामुळे पानगाव (रेनापूर) येथे कार्यरत असलेले रेल्वेस्टेशन मास्तर नितीन भंबारे यांनी पनवेल परळी रेल्वेला लाईन मिळवण्यासाठी मुसाफिरसिंह यांच्याशी पावणे चारच्या सुमारास दुरध्वनीवरून संपर्क साधण्याचा संपर्क केला. परंतू ते फोन घेत नसल्याने अंबाजोगाई ते अहमदपूर मार्गावर असलेले रेल्वे गेट मन विजय मिना यांना स्टेशन मास्तर फोन का उचलत नाही? हे पाहण्यासाठी घाटनांदूर स्थानकात पाठवले. यावेळी त्यांचा र्हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालयाचे निदर्शनास आले. त्यामुळे पनवेल ते परळी हि रेल्वे पानगाव रेल्वेस्थानकात तर काकीनाडा शिर्डी एक्सप्रेस हि रेल्वे परळी स्थानकात दिड तास थांबवण्यात आली होती.