मादळमोहीच्या सभेत विराट जनसमुदयाचे दर्शन, आता मला चिंता नाही
बीड (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना उमेदवार सोबत असतानाही सभेला गर्दी जमत नाही यांचे कारण लोकाच्या मनात उमेदवारी बदलल्याचा राग असून ज्यांनी विरोधी पक्ष नेते पदावर बसवले त्यांच्याच पाठीत खंजिर खुपसण्याचे काम धनंजय मुंडेंनी केले. राजकारणात संधी अली होती पण मित्राला त्यांनी धोका दिला जे लोक रक्ताचे होत नाहीत ते मित्राचे कसे होतील? असा सवाल ना.पंकजाताई मुंडे यांनी करत विरोधी पक्षाच्या पायगुणामुळे बीड जिल्हयात राष्ट्रवादी पक्षाची वाताहत झाल्याचा घणाघात त्यांनी केला. जयदत्त क्षीरसागर यांच्या निर्णयाचे जाहिरपणे स्वागत करताना बीड जिल्हयाच्या राजकारणात मी विकासाचेच राजकारण करत असून निधी देताना जात पाहत नाही मग तुम्ही मते देताना जात पाहणार का? असा सवाला त्यांनी विचारला. दरम्यान सायंकाळच्या वातावरणात मादळमोहीत मिळालेल्या विराट सभेचा प्रतिसाद पाहून मंत्री पंकजाताईंचा उत्साह वाढला आणि आता मला मुळीच चिंता वाटत नाही हे सांगून त्यांनी दोन उमेदवारामधील फरक काय? हे सभेवरून लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ मादळमोहीत काल शिवसेना नेते बदामराव पंडित यांनी ना.पंकजाताई मुंडेंची जाहिर सभा आयोजित केली होती. या सभेची विराट गर्दी पाहून उत्साहित झालेल्या मंत्री महोदयांनी सुरुवातीलाच सांगितले की, सभेचा फोटो काढा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दाखवा. हि सभाच दोन उमेदवारामधील काय फरक आहे याचे दर्शन घडवते. हे सांगताना सभेचा उत्साह आणि लोकांचे प्रेम पाहून माझा उत्साह वाढला. मला आता विजयाची चिंता वाटत नसून ग्रामदैवत मोहिमाताचा आशिर्वाद घेवून आल्याचे त्यांनी सांगितले. बदामराव पंडित यांनी गोपीनाथराव मुंडे साहेबांना खंबीरपणे साथ दिल्याची आठवण करून देताना युध्दाजित पंडित यांचे कौतुक केले. या सभेत शिवसेनेचे तालुकाध्यक्ष कालिदास नवले, जेष्ठ नेते पंढरीनाथ लगड यांनी भाषणात राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदार संघात लोक जमत नाहीत. परवा एका ठिकाणी उमेदवार बजरंग सोनवणे भेटण्यास आले तेव्हा भाजपा शिवसेनेच्या घोषणा देवून त्यांची खिल्ली उडवल्याचे सांगितले. हा धागा पकडून पंकजाताई म्हणाल्या की, हि निवडणुक आता सामान्य जनतेने हातात घेतली आहे. आमचे विरोधक तोंड बारीक करून प्रचार करीत असले तरी ज्या बीड जिल्हयाने राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांना प्रचंड ताकद दिली, त्याच जिल्हयात पक्षाची वाताहत होत असून धंनजय मुंडेंचा पायगुण कारणीभुत आहे. सुरेश धस यांच्या पाठोपाठ जयदत्त आण्णाही पक्षाबाहेर जात असून क्षीरसागरांच्या निर्णयाचे त्यांनी जोरदार स्वागत केले. विरोधी पक्ष नेते पदावर बसविण्यासाठी अमरसिंह पंडितांनी मनाचा मोठेपणा दाखवून सहकार्य केले मात्र ऐनवेळी मित्रालाही धोका दिल्याचा त्यांनी टोला मारला. त्यामुळे या मतदार संघात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज आहेत मात्र मत वाया घालवू नका कारण दोन उमेदवाराचा फरक ओळखा.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बीड जिल्हयात दोन कामे केल्याचे जाहिरपणे सांगावे. प्रितमताईंनी काम करताना जिल्हयात विकासाचे प्रश्न मार्गी लावून इतिहास घडवला आहे. मागच्या चार वर्षात जातीपातीचे राजकारण मी कधीच केले नाही. विकासनिधी देताना जात न पाहता सामाजाच्या कल्याचा विचार मी केला. मग तुम्ही मला मतदान देताना जात पहाणार का? हा सवाल त्यांनी जाहिरपणे विचारला. तेव्हा हजारो उपस्थित जनतेने असा आम्ही करणार नाही हात वरून शब्द दिला. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे भाषण झाले. युवानेते युध्दजित पंडित आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा जाहिरपणे संकल्प बोलून दाखवला.
व्यासपीठावर सौ.गिरीजाभाभी पंडित, सभापती स्मिताताई, अनुरुपाताई पंडित, कमलबाई तळेकर, ऍड.उध्दव रासकर, युवराज डोंगरे, सौ.भोपले आणि नागरेताई रोहित भैया, बप्पासाहेब तळेकर, राजाभाऊ मुंडे, राजेंद्र बांगर, उज्ज्वला भोसले आदि मान्यवरासह अनेकांची उपस्थिती होती. पंधरा हजारपेक्षा अधिक जनसमुदाय सभेसाठी उपस्थित होता.