मयत शेतकऱ्यांच्या नावच्या जमिनी लाटणाऱ्यांनी ‘वैद्यनाथ’ च्या अन्नात माती कालविणे दुर्दैवी – ना. पंकजाताई मुंडे
येळंबघाट येथील तुफानी गर्दीच्या सभेने राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकली
बीड दि. ०६: मयत शेतकऱ्यांच्या नावच्या जमिनीही जगमित्र या न झालेल्या कारखान्याच्या नावाखाली लाटणा-यांनी वैद्यनाथच्या अन्नात माती कालविण्याचा प्रकार दुर्दैवी आहे असा घणाघात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केला.जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेने जिल्हयातील उरली सुरली राष्ट्रवादीही नेस्तनाबूत झाली आहे, आमच्या भावाचा पायगुणच तसा आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.
भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ येळंबघाट येथे झालेल्या तुफान गर्दीच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत आ. सुरेश धस, रमेश आडसकर, रमेश पोकळे, आ. संगीता ठोंबरे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेताना पंकजाताई म्हणाल्या की, सर्व सिंचन प्रकल्प आपल्याच भागात नेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बीड जिल्हा कायम कोरडा ठेवला. निधी देण्याऐवजी त्यांनी नेहमीच जिल्ह्यातील घरे फोडण्यावर भर दिला. आमच्याही घरात तेच केले. आमच्या भावाने जेंव्हा नगरपालिका फोडली त्यावेळेस गोपीनाथराव मुंडे यांनी झोपेत धोंडा घातल्याची खंत व्यक्त केली होती. मात्र, अनेकदा संधी येऊनही कोणाचेही फोडण्याचे पाप मी केले नाही. कोण आपले. कोण परके हे न पाहता जिल्ह्यात भरघोस निधी देऊन सर्वांगीण विकास केला. आमची सत्ता येण्यापूर्वी उपेक्षित बीड जिल्ह्यात रस्त्यांची अवस्था देखील प्रचंड वाईट होती. रस्त्याने जाताना दातात चणे ठेवले त्याचा भुगा व्हायचा. खड्ड्यामुळे अपघात होऊन अनेक लोक दगावले. मात्र आम्ही येताच रस्ते सुधारण्यावर भर दिला. आज जिल्ह्यात सर्वत्र महामार्गांचे जाळे आहे. अंतर्गत रस्तेही मोठ्या प्रमाणत झाली. एकट्या पाली गटात १६४ किमीचे रस्ते केलेत तर जिल्ह्यातील ६० गटात एकूण किती रस्ते झाले असतील याचा हिशोब तुम्हीच करा असे म्हणत त्यांनी सप्रमाण विकासकामांची यादी सांगितली. आज तुमच्याकडे मत मागण्यासाठी आले नसून केलेल्या विकास कामांच्या जोरावर हक्क मागत आहे, तुमची लेक आणि बहिण या नात्याने तुम्ही तो देणारच आहात अशी साद त्यांनी जनसमुदायाला घातली. राणा डोईफोडे यांनी प्रास्ताविकात मुंडे यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची माहिती दिली.
आमच्या भावाचा पायगुणच तसा
आमचे भाऊ राजकरणात आले तेंव्हापासून आमची सत्ता गेली, अनेक अडचणी आल्या. जिल्ह्यात मी एकटी भाजपची आमदार तर इतर राष्ट्रवादीचे होते. त्यानंतर आमचे भाऊ राष्ट्रवादीत गेले आणि त्यांच्या पायगुणामुळे त्यांची सत्ता गेली. सर्व मातब्बर नेते पक्षाबाहेर पडले. आता जिल्ह्यात सर्व भाजपचे आमदार असून राष्ट्रवादीचे एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर हे देखील बाजूला झाले आहेत. आमच्या भावाचा पायगुणच तसा असल्याचा टोला पंकजाताई मुंडे यांनी लगावला.
आमचे राजकारण जातीचे नाही तर मातीचे
सभेदरम्यान पंकजा मुंडे यांनी विविध गावांच्या सरपंचांना सर्वांसमक्ष बोलावून त्यांच्या ग्राम पंचायतींना किती निधी आला यांची जाहीर माहित देण्यास सांगितले. त्यात हादगावला १ कोटी २० लाखांचा निधी, भंडारवाडीला ७ कोटी ५० लाख आणि कळसांबर ७ कोटीचा निधी आल्याचे सरपंचांनी सांगितले. यापैकी भंडारवाडी शिवसंग्रामच्या ताब्यात आहे तर तिन्ही गावे मराठा बहुल लोकसंख्येची आहेत. हा धागा पकडून पंकजा मुंडे म्हणाल्या कि, आम्ही जातपात, पक्ष याच्या पलीकडे जाऊन विकास करतो, आम्ही जातीचे नाही तर मातीचे राजकारण करतो.
राष्ट्रवादीचे उमेदवार ‘बिचारे’
अमरसिंह पंडित यांना दगा देऊन ऐनवेळी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात ‘बिचाऱ्या’ बजरंग सोनवणे यांना बळीचा बकरा बनविण्यात आले आहे. त्यांनी आजवर उसाच्या मापात काटा मारून जेवढे कमविले आहे तेवढे सगळे या निवडणुकीत गमविणार अशी खोचक टीका त्यांनी यांनी सोनवणे यांच्यावर केली.
वाघिणीचे रहस्य उलगडले
ना. पंकजाताई मुंडे यांचा उल्लेख त्यांचे समर्थक नेहमीच ‘वाघीण’ असा करतात. नुकतेच प्रीतम मुंडे यांच्या प्रचाराच्या सभेत पंकजाताई मुंडे यांचे ‘वाघिणीची शिकार गुलेलने करायंची नसते’ अशा शब्दांत राष्ट्रवादीला सुनावले होते. यावर सभेत बोलताना त्यांनी वाघीण शब्दाचे रहस्य उलगडले. संघर्ष यात्रे दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा येथील सभेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच आपल्याला वाघीण ही उपाधी दिल्याचे त्यांनी सागितले. बीडची वाघीण चंद्रपुरात येऊन सभा घेत आहे असे कौतुक त्यावेळी मुनगंटीवार यांनी केले होते.