वर्धा/हिंगोली: विरोधी पक्ष नेता तोडपाणी करणारा असता तर तुमचे घोटाळे बाहेर काढले नसते. शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले पैसे दिले तर बरं होईल, असा टोला विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना लगावला आहे.
धनंजय मुंडे वर्ध्याच्या आघाडीच्या उमेदवार चारुलता टोकस यांच्या प्रचारसभेत आष्टी येथे ते बोलत होते. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारासाठी हिंगोली येथील जाहीर सभेतही मुंडे यांनी पंकजाताई यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.
पंकजा मुंडेंच्या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी, मी मुंडे साहेबांचा वारस स्वतःला कधीच समजत नाही, असं सांगितलं. शिवाय वारसाहक्क पंकजाताईंनीच सांभाळावा, असंही ते म्हणाले.
विरोधी पक्षनेता तोडपाणी करणारा असता तर तुमच्या सरकारचे घोटाळे बाहेर काढला नसते. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तुम्ही सरकारमध्ये आहात, तेव्हा तुमच्याच अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी.आणि तुम्ही केलेल्या घोटाळ्याची मी करतो, होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी ? असे आव्हानच दिले.
जनाची नाही तर मनाची ठेवावी आणि शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले पैसे दिले तर बरं होईल. तुम्ही चिक्कीत २०० कोटी खाल्ले. ११० कोटींच्या फोनमध्ये ७० कोटी खाल्ल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला.