परळीच्या सभेत ना. पंकजाताई मुंडेंची जोरदार फटकेबाजी
परळी दि. ०९: लग्नघटिका जवळ आलीय, बॅण्डबाजा वाजतोय, राष्ट्रवादीचा नवरदेव सजून घोडीवर बसलाय. वरात निघालीय. घोडीवाला घोडी बळेच ओढतोय, पण वऱ्हाडी आहेत कुठं? समोर नाचायलाही कोणीच नाही आणि मागेही कोणीच नाही. त्यांच्या सगळे वऱ्हाडी तर आमच्या वरातीत सामील झाले आहेत असे म्हणत शेलक्या शब्दात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यात वाताहत झालेल्या राष्ट्रवादीची लक्तरे काढली. सुरेश धस आमच्याकडे आले, भीमराव धोंडेसोबत ते एकाच गाडीत बसून आमच्यासोबत आहेत. गेवराईत लक्ष्मण पवार आणि बदामराव पंडित हे एकत्रितपणे प्रीतमताईंच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत, रमाकांत आणि विक्रम मुंडे हे एकाच स्टेजवर आलेत. शिवसंग्रामचे तीन जि.प. सदस्य आमच्यासोबत आले, जयदत्त क्षीरसागर यांनीही जाहीररित्या पाठींबा दिला. तसेच, आमच्या वरातीत हिरवा, भगवा, निळा, पिवळा असे सर्व रंग सोबत आहेत त्यामुळे प्रीतमताईंचा विजय निश्चित आहे. आम्ही आता फक्त लीड मोजण्याचे काम करतोय असे म्हणत त्यांनी प्रचंड मताधिक्क्याने विजयाचा दावा केला.
डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर येथे शिवाजीनगर- नागसेननगर- आंबेडकरनगर- अशोकनगर- ईराणी वस्ती या भागाची संयुक्त जाहीर सभा झाली. या विराट सभेला संबोधित करताना ना. मुंडे म्हणाल्या की, आम्ही भगिनींनी जिल्ह्याच्या आणि परळी शहराच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या आहेत. पाणी टंचाईच्या काळात खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी मागेल तिथे बोअर देवून महिला भगिनींना मोठा आधार दिला. पालिका ताब्यात नसतानाही आम्ही शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देत नाहीत. वैद्यनाथ मंदिराच्या विकासासाठी १३३ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केला असुन या महत्वाकांक्षी योजनेचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगतिले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर चौफर टीकेची झोड उठवली. जात-धर्माच्या मुद्द्यावरून इंग्रजांनी देश उभा फाडला मात्र राष्ट्रवादीवाले आडवाही फाडीत आहेत. जातीपातीच्या भिंती उभ्या करून समाजामध्ये विषाची पेरणी करण्याचे पाप ते करीत आहेत. मात्र जनता त्यांना थारा देणार नाही असे त्या म्हणाल्या.
परळी – अंबाजोगाई रस्ता दसऱ्यापर्यंत पूर्ण होणार
मला बदनाम करण्यासाठीच परळी-अंबाजोगाई रस्त्याचे राजकारण केले जाते. तो रस्ता पुर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करीत असुन धुळीचा त्रास दसर्यानंतर बंद होईल असे सांगुन या कामाबद्दल मला ही खंत वाटते असे पंकजाताई म्हणाल्या.
विकासाच्या मागे उभे रहा – राजेश देशमुख
ना.पंकजाताई आणि खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी कधीही जातीभेद केला नाही. विकास हीच जात समजून त्यांनी काम केले. सबका साथ सबका विकास या प्रमाणे त्यांनी सर्वाना विकासाच्या प्रवाहात सामावून घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यातही त्यांनी पुढाकार घेवून मोठे योगदान दिले. त्यामुळे विकासासाठी जनतेने खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांना परळीची लेक समजून मताधिक्य द्यावे असे आवाहन भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख यांनी केले.
भूलथापांना बळी पडू नका – धम्मानंद मुंडे
राष्ट्रवादीवाले खोटे बोल पण रेटून बोल या पध्दतीने काम करतात. खरे जातीयवादी तेच असुन त्यांना विकासाशी नव्हे तर भ्रष्टाचाराशी देणेघेणे आहे. त्यांनी परळी पुर्णपणे भकास केली असुन विकासासाठी आलेला निधी खिशात घातला आहे. ते आता जातीजातीत विष पेरण्याचे काम करणार असुन त्यांच्या भूलथापांना बळी न पडता खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांना मताधिक्याने विजयी करा असे आवाहन रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष धम्मानंद मुंडे यांनी केले.