शेतकर्यांचा रोष मतपेटीतून व्यक्त होणार
बीड दि.०९: राज्यात भिषण दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चार्याचा आणि पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. मात्र दुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडुन ते निवडणुक प्रचारात दंग झाले असल्याची टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आतापर्यंत राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये फिरताना अतिशय भिषण दुष्काळ जाणवल्याचे श्री.मुंडे यांनी सांगितले. या वर्षी राज्यात इतका भिषण दुष्काळ आहे की, मागच्या वर्षी याच काळात एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला राज्यात केवळ ६११ टँकर्स सुरू होते, आज यावर्षी ३९७० इतके सुरू आहेत. यावरून पाण्याच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येते. अनेक गावांमध्ये मागणी होऊनही टँकर्स सुरू झाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
औरंगाबाद, नाशिक आणि पुणे विभागातील जनावरांची संख्या ८५ लाख असताना छावण्यांमधून केवळ ६ लाख जनावरांना आसरा मिळालेला आहे, लाखो जनावरांच्या चार्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणुन दिले. सरकारने चारा दावणीला द्यायचा की, थेट मदत द्यायची की, छावण्या उघडायच्या यातच तीन महिने काढले, शेतकर्यांची केवळ पाच जनावरे छावण्यांमध्ये घ्या, स्वयंसेवी संस्थांना प्राधान्य द्या, आढावा घ्या, छावण्यांचे अधिकार पालकमंत्र्यांना द्या, अशा जाचक अटी घातल्यामुळे अनेक तालुक्यात छावण्याच सुरू झाल्या नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणुन दिले. मागील काळात सरकारने जाहीर केलेली अनुदाने मिळालेली नाहीत, कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य पध्दतीने झालेली नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. अनेक मुलभूत प्रश्नांच्या पेक्षाही राज्यातील दुष्काळामुळे त्रस्त शेतकर्यांमध्ये सरकार विरूध्दचा तिव्र असंतोष पहावयास मिळत असून, हा असंतोष मतपेटीतून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.