मुंडे साहेबांनंतर प्रितमताईंना ९९ टक्के मतदान देणारे गाव!
बीड दि.१०: खरं तर पंकजाताई म्हणजे डॅशिंग आणि आक्रमक नेत्या! पण डोंगर पट्ट्यातील भोळ्या भाबड्या जनतेचे निःस्वार्थी प्रेम पाहुन त्यांचेही मन भरून आले. अगोदर मुंडे साहेब आणि आता खा. डॉ. प्रितमताईंना ९९ टक्के मतदान देणारे गाव हे जिवाची नव्हे तर माझ्या “जिवातील वाडी” आहे, असे उदगार काढून ना. पंकजाताईंनी या गावाचा गौरव केला.
प्रचारानिमित्त आलेल्या साहेबांच्या लेकीचे या परिसरातील महिला, पुरूष अशा अबालवृद्धांनी केलेल्या स्वागताने उपस्थित सर्वांचेच डोळे भरून आले. ना. पंकजाताई मुंडे मुंडे म्हणजे महाराष्ट्रातील आक्रमक, डॅशिंग आणि स्पष्टवक्ते नेतृत्व. पण सामान्य जनतेचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावरील नि:स्वार्थी, नि:स्सिम प्रेम पाहून त्यांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ ना. पंकजाताई मुंडे यांनी मंगळवारी वडवणी, कोठरबन, जिवाची वाडी असा डोंगर पट्ट्यात दौरा केला.
जिवाची वाडी हे तसे अगदी लहान गाव. पण येथील सर्वांचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर अगदी जिवापाड प्रेम करतात. स्वातंत्र्यापासुन या गावाला साधा रस्ताही नव्हता. मुंडे साहेब आणि जिवाची वाडीचे अगदी जिवातले नाते. साहेबांनी परिसरातील तलाव पुर्ण करून दिला. त्यामुळे गावात सुबत्ता आली आणि गाव पुर्णपणे साहेबांचे झाले. साहेबांना या गावाने ९९ टक्के मतदान दिले आणि साहेबानंतर हीच परंपरा डॉ. प्रितमताईंच्या बाबतीत कायम ठेवली. यावेळी देखील तीच परंपरा पुढे चालवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. ना. पंकजाताई मुंडे या गावात आल्यानंतर अख्खे गाव त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर आले. ग्राम देवतेच्या जवळ साहेबांच्याच फंडातून बांधण्यात आलेल्या सभागृहात ना. पंकजाताईंना बोलण्याचा आग्रह जनतेने केला. कोणताही पुर्वनियोजित कार्यक्रम नसताना अख्खे गाव तेथे जमा झाले होते. ना. पंकजाताईंनीही कशाचाही विचार न करता तेथील टेबलवर चढून जनतेशी मुक्त संवाद साधला. साहेबांनी तलाव दिला तर मी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात पहिला रस्ता मंजूर करून हे गाव मुख्य रस्त्याला जोडले. साहेबांनी मला सांगितले होते की, जिवाची वाडी हे माझ्या जिवाला जीव देणारे गाव आहे याला कधीही अंतर देऊ नको. म्हणुनच मी पहिला रस्ता देऊन गावाला जगाशी जोडले असे सांगून आज या गावातील पूर्ण झालेला रस्ता पाहून समाधान वाटले. ही फक्त जीवाचीवाडी नसून माझ्या ‘जीवातली वाडी’ आहे असे सांगून आगामी काळातही ही वाडी प्रीतमताई यांच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या डोंगर पट्ट्यातील गावच्या महिला, पुरुष, अबालवृद्धांनी दाखवलेल्या प्रेमाने ना. पंकजाताई मुंडे याही भारावून गेल्या.