लातूर : सैनिकांनी केलेल्या शौर्याचा वापर जर कोणी आपण न केलेले काम झाकण्यासाठी करत असेल, तर जनता ते कधीही मान्य करणार नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचीन पायलट यांनी केली आहे. लातूर येथील काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांच्या प्रचारसभेत त्यांनी हे विधान केले. तसेच मोदी यांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून तात्काळ तपासणी करून योग्य ती कारवाई करावी असे मत पायलट यांनी व्यक्त केले.
काल लातूरमधील औसा येथे मोदी यांची सभा झाली आणि या सभेत त्यांनी नवीन मतदार करणाऱ्या मतदारांना साद घालत सैनिकांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत मतं मागितली. धर्म आणि सैनिकांनी राजकारणात आणू नये तसेच सैनिकांनी केलेल्या शौर्याबद्दल कुठल्याही पक्षांनी नेत्यांनी मतासाठी त्याचा वापर करू नये असा आदेश कोर्टाने दिलेला आहे. मात्र, तरी देखील मोदींनी औसा येथील जाहीर सभेत मतांचा जोगवा मागताना तरुणांना आवाहन केलं. या आवाहनावरून राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचीन पायलट यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
मोदींवर टीका करताना सचिन पायलट म्हणाले की, ‘सैनिकांनी केलेल्या शौर्याचा वापर जर कोणी आपले न केलेले काम झाकण्यासाठी करत असेल, तर जनता ते मान्य करणार नाही. मोदी यांनी काल सभेत काय बोलले त्याची निवडणूक आयोगाकडून तपासणी झाली पाहिजे. व्यक्ती किती ही मोठा असेला तरी जबाबदारीने बोललं पाहिजे. इलेक्शन कमिशनने तात्काळ याची तपासणी करून योग्य ती कारवाई करावी. ‘ असे पायलट म्हणाले.