बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

शेतकऱ्यांच्या ऊसात काटा मारणारे हे कसले शेतकरी पुत्र ?―पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीच्या ढोंगीपणावर प्रहार

युसूफ वडगांवच्या सभेत ना. पंकजाताई मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या ढोंगीपणावर प्रहार

डाॅ. प्रितमताई मुंडे यांना मत म्हणजे जिल्हयाच्या विकासाला मत

बीड दि. ११: शेतकऱ्यांच्या उसात काटा मारणारे शेतकरीपुत्र असू शकतात का असा सवाल राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताईं मुंडे यांनी केला आहे. न झालेल्या कारखान्याच्या नावावर ज्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या, अगदी मयत शेतकऱ्यांनाही सोडले नाही तेच आज वैद्यनाथ कारखान्याच्या नावाने ओरड करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ केज तालुक्यातील युसूफ वडगांवच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी पंकजाताईंनी आजवर या भागासाठी केलेल्या विकासकामांचा आढावा मतदारांसमोर मांडला. आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, संतोष हंगे, बालासाहेब अंबुरे, योगिनी थोरात, संदीप पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

  मागील चार वर्षात जिल्ह्यात होत असलेले राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा रस्ते, अंतर्गत रस्ते याबाबत माहिती दिली.मुंडे साहेब विरोधी पक्षातील उमेदवार कोण असावेत हे देखील ठरवायचे. तसाच काही प्रकार या निवडणुकीतही घडला असल्याचे पंकजाताई म्हणाल्या. मात्र, मॅनेज असल्याची चर्चा वाढल्याने बदनामी टाळण्यासाठी तो उमेदवार प्रचारार्थ बाहेर पडला. सत्ता हे राष्ट्रवादीचे दिवास्वप्न आहे. त्या पक्षात चांगल्या माणसांची ॲलर्जी आहे. आमच्या भावाच्या पायगुणामुळे अख्खी राष्ट्रवादी रिकामी झाली आहे. एखादी सभा अथवा दौरा यशस्वी झाला कि रात्री तिकडे शेतात दारू-मटणाच्या पार्ट्या होत आहेत. हे काम काय नेत्याने करायचे असते का? किती दिवस लोकांना वेड्यात काढून मते घेण्याचा प्रयत्न करणार? काळ बदलला आहे. आता लोक उमेदवाराची विकास क्षमता पाहूनच मतदान करतात. त्यामुळे प्रीतमताईंचा विजय निश्चित आहे. लोक आतापासूनच प्रीतमताईंना आपापल्या गावातून किती मताधिक्क्य मिळणार यावर पैजा लावू लागले आहेत असे पंकजाताईनी सांगितले.

  उसाला काटा लावणारा कसला शेतकरीपुत्र?

  शेतकऱ्यांच्या उसात काटा मारणारे शेतकरीपुत्र असू शकतात का असा सवाल पंकजाताईंनी केला. न झालेल्या कारखान्याच्या नावावर ज्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या, अगदी मयत शेतकऱ्यांनाही सोडले नाही तेच आज वैद्यनाथ कारखान्याच्या नावाने ओरड सुरु केली आहे. कर्ज मिळण्यास लागलेला विलंब आणि काही तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला शेतकऱ्यांचे पैसे देण्यास उशीर झाला. परंतु, एकही रुपया आम्ही शिल्लक ठेवणार नाहीत, तशी नियतही आमची नाही असे पंकजाताईंनी सांगितले.

  नदीजोड प्रकल्पाद्वारे बीड जिल्ह्यासह मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणार

  आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला भकास करण्याचे काम केले, मागासलेपणाचा शिक्का मारला. परंतु, आम्ही आता ३२ हजार कोटींच्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा खोऱ्याचे पाणी बीडमध्ये आणणार आहोत. भविष्यात तुमच्या शेतीलाही पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास होतो आहे, त्यामुळे बीड जिल्हादेखील आता उपेक्षित राहणार नाही असा विश्वास पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.


  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.