राजकारणातील पत आणि प्रतिष्ठा गेल्याने विनायक मेटेंचे मानसिक संतुलन बिघडले―राजेंद्र मस्के यांचा प्रहार

ना.पंकजाताई मुंडे यांच्यावर टिका करण्याची लायकीसुध्दा नाही

बीड दि.११: स्वत:ला स्वंयघोषित राष्ट्रीय नेते समजणार्‍या आ.विनायक मेटे यांच्याकडे एकही लोक प्रतिनिधी आणि पदाधिकारी न राहिल्याने जिल्ह्याच्या राजकारणातून पत आणि प्रतिष्ठा गेल्यामुळेच आ.मेटे यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखी अवस्था झाली आहे. यामुळेच ते राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यावर बेछूट आणि पातळी सोडून आरोप करत आहेत. पंकजाताईंवर टिका करुन मराठा समाज आपल्या पाठीमागे पुन्हा यावा असा केविलवाणा प्रयत्न करणा-या मेटेंची पंकजाताईवर टिका करण्याची लायकीही नाही असे भाजपचे युवा नेते राजेंद्र मस्के यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

राज्याच्या ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून पंकजाताई यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी आणला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून प्रत्येक गाव महामार्गाला जोडले गेले. एवढेच नव्हे तर जिल्ह्यामधून आठ राष्ट्रीय महामार्ग आणि दोन पालखी महामार्ग गेल्याने दळणवळणाच्या दृष्टीने मोठ्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत. बीड रेल्वेचे कामही अंतिम टप्प्यात असून बीड शहरालगत जाणारा धुळे-सोलापूर महामार्ग पुर्णत्वाकडे गेला आहे. या भौतीक सुविधांबरोबरच शेतकर्‍यांना विविध सवलती आणि अनुदान देण्यासाठीही पंकजाताईंनी सतत प्रयत्न केले आहेत. देशात सर्वात जास्त पिकविमा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळवून देण्यात पंकजाताई यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनाधार त्यांच्या पाठीशी आहे असे असतानाही केवळ राजकीय विरोध म्हणून आ.विनायक मेटे यांनी गेल्या काही महिन्यांपासून आपले अस्तित्व अबाधित रहावे यासाठी पंकजाताईंना विरोध करत आहेत.

जशास तसे उत्तर दिले जाईल

विनायक मेटे यांनी जिल्हा प्रशासनामध्ये विनाकारण लुडबूड केली. एवढेच नव्हे तर अत्यंत खालच्या पातळीवर जावून पंकजाताईवर अनेकवेळा टिकाही केली. भाजपाबरोबर महायुतीसोबत असल्याने शिवसंग्रामला नेहमीच राज्य सरकारकडून सन्मान देण्याचा प्रयत्न झाला. त्या बळावरच मेटे गटाचे जि.प.सदस्य निवडून आले. मात्र ते देखील त्यांच्याकडे टिकू शकले नाहीत. पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आ.मेटे यांच्या एकाधिकारशाहीला वैतागून भाजपामध्ये सामील झाल्याचे शल्य मेटेंना चांगलेच बोचले आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखे ते वागू लागले आहेत, पंकजाताईंवर टीका कराल तर जशास तसे उत्तर दिले जाईल. राष्ट्रवादीला पाठींबा देताना केलेल्या भाषणामध्ये त्यांनी जी शिवराळ भाषा वापरली त्यावरुन त्यांच्यातील गुणवत्ता आणि त्यांच्या विचाराची पातळी जनतेच्या लक्षात आली आहे. वास्तविक पाहता पंकजाताई मुंडेंवर टिका करण्याची त्यांची लायकीही नाही. भविष्यात त्यांनी त्यांचे राजकारण करताना आमच्या भगिनी पंकजाताई मुंडेंवर टिका केली तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशाराही मस्के यांनी दिला आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.