सदरचा अपघात हा सकाळी ९ ते ९.३० च्या दरम्यान घडला. अपघाताची भीषणता एवढी भयानक होती की, अपघातस्थळी रक्तमांसाचा चिखल झाला होता. अनेक मृतदेह गाडीत लटकून होते. लातूर, अंबाजोगाई रोडवर दुभाजक नसल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येते.

याबाबत सविस्तरवृत्त असे की, अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील गंगणे दाम्पत्य हे चारधाम वारी करून परत आले होते. त्यानिमित्ताने मावंद्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील आर्वी येथील पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. आज सकाळी ते सर्व जण क्रुझर क्र. एम.एच.२४ व्ही.८०६१ या जीपमध्ये बसून राडी गावाकडे निघाले होते. बर्दापूर फाट्याजवळ असलेल्या नंदगोपाल दूध डेअरीजवळ या सर्वांना काळाने झडप घातली. समोरून येणार्या भरधाव ट्रक (क्र. आर.जे.११ जी.९२९०) याची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही वाहने वेगात असल्याने ट्रकच्या धडकेने अक्षरश: क्रुझरचा चेंदामेंदा झाला. क्रुझरमध्ये पंधरापेक्षा जास्त प्रवासी असल्याचे सांगण्यात येते. या अपघातात सात जण जागीच ठार झाले तर आठ जण गंभीर जखमी झाले.

अपघाताची भयानकता आणि भीषणता एवढी होती, की क्रुझरचा चक्काचूर झाला होता. काही प्रवासी बाहेर फेकले गेले होते. मृतदेह गाडीत अडकून पडले होते. अपघातस्थळी अक्षरश: रक्तमांसाचा चिखल झाला होता. महामार्गावरून प्रवास करणारे आणि घटनास्थळ नजीक असणार्या लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघातातील अनेकांना त्यांनी सुरक्षितस्थळी ठेवले. या अपघातात स्वाती बोडखे, निर्मला सोमवंशी, शकुंतला सोमवंशी, सोजर कदम, चित्रा शिंदे, बंडु रोहीले यांच्यासह अन्य एकजणाचा मृत्यू झाला. तर प्रेमला सोमवंशी (वय ४०), कमल जाधव (वय ५०) राजमती सोमवंशी (वय ५५) रंजना माने (वय ४५), दत्तात्रय पवार (वय ७५), वर्षा चिमा शिंदे (वय ३६), शिवाजी पवार (वय ६५), दोन अनोळखी असे जखमी झाले. या गाडीत एकूण १९ जण प्रवास करत होते. जखमींना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.