आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
पाचोरा दि.१३: जळगाव विभाग परिवहन महामंडळाच्या मार्ग तपासणी पथकाने पाचोरा येथे तिकीट तपासणी केली दरम्यान वाडी शेवाळे येथे पाचोरा सिल्लोड या सोयगाव आगाराच्या एमएच २० बीएल २२५२ बसची तपासणी केली असता या बसच्या वाहकाने तिकीट वितरणामध्ये अनियमितता केल्याचे पथकाच्या लक्षात आले.
शर्मा नामक या वाहकाने जास्तीचे पैसे घेऊन कमी रकमेचे तिकिटे प्रवाशांना दिल्याचे तपासणी पथकाचे लक्षात आले. विशेष म्हणजे प्रवाशांना समजेल अशा मराठी भाषेत तिकीट देणे अनिवार्य असताना या वाहकाने जाणून-बुजून इंग्रजी माध्यमाचे अंकित केले तिकीट प्रवाशांना दिलेली आहे .एका वयोवृद्ध महिलेला नागरिक ज्येष्ठत्वचा लाभ न देता पूर्ण रकमेचे तिकीट घेऊन प्रवाशाची गैरसोय या वाहकाने केली आहे. दुसर्या एका महिला प्रवाशांकडून ९० रुपये घेऊन प्रत्यक्षात साठ रुपयांचे तिकीट संबंधित महिलेस देण्यात आले आहे .विशेष म्हणजे तपासणी पथकाला समोर पाहून या वाहकाने चलाखी करत काही प्रवाशांना वेळेवर तिकीटे वितरित केल्याचे तपासणी निरीक्षकांनी सांगितले .परिवहन वाहतूक निरीक्षक एसबी बडगुजर नन्नवरे केळी कोल्हे डी के पाटील या मार्ग तपासणी पथकाने ही कारवाई केली .औरंगाबाद पाचोरा तसेच सोयगाव आगाराच्या बसेसमधील वाहक अनेकदा प्रवाशांकडून पैसे घेतात मात्र तिकीट देत नसल्याचे अनुभव अनेक प्रवाशांनी सांगितले आहे या बाबीची गंभीर दखल घेऊन परिवहन महामंडळाने दोषींवर कारवाई करून परिवहन महामंडळाचे नुकसान टाळावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.