गावकऱ्यांच्या सहभाग आणि शांतिवन च्या मदतीने १२ लाखांच्या निधीतून साडेचार किलोमिटर नदीचे रुंंदीकरण, खोलीकरण
बीड (प्रतिनिधी): दुष्काळाच्या अापत्तीला इष्टापत्ती मानून शांतिवन संस्थेने सुरु केलेल्या पाणी अभियानातून गेवराई तालुक्यातील टाकळगव्हाणमध्ये १२ लाख रुपये खर्चून साडेचार किलामिटर पर्यंत नदीचे खोलिकरण आणि रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात टाकळगव्हाण पाणीदार गाव होणार आहे.
दुष्काळात एकीकडे निवडणुकांचे वातावरण उन्हा इतकेच गरम होत असताना दुसरीकडे शांतिवन प्रकल्प मात्र यंदा दुष्काळग्रस्तांसाठी धावून आला आहे. गेवराई तालुक्यातील टाकळगव्हाण या गावाला सातत्याने दुर्भिक्षाचा सामना करावा लागत असे. शांतिवन प्रकल्पाने सुरु केलेल्या पाणी अभियानात टाकळगव्हाणकरांनी यंदा सहभाग नोंदवला. ग्रामस्थ एकवटले आणि शांतिवनमार्फत पुरवल्या जाणाऱ्या यंत्रांना इंधनासाठी ४ लाख रुपयांचा निधी गावकऱ्यांनी जमा केला तर शांतिवननेही ८ लाखांचा निधी देऊन टाकळगव्हाणकरांच्या पाणीदार गावच्या स्वप्नाला बळ दिले.
महिनाभरापासून टाकळगव्हाणमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आलेली आहे. नदी, ओढा रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे काम जेसीबी यंत्राद्वारे करण्यात आले आहे. गावकरी या कामांमध्ये तन, मन आणि धनाने उतरले असून अवघ्या काही दिवसांत गावच्या शिवारातील नदीचे साडेचार किलोमिटर रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर पाण्याची साठवणूक यामुळे होणार असून येत्या पावसाळ्यात या कामाचे सकारात्मक परिणाम दिसणार आहेत. शांतिवन प्ररित पाणी अभियानचे दीपक नागरगोजे, सुरेश राजहंस यांनी पहिल्याच बैठकीत गावकऱ्यांना एकत्र येण्याचे केलेले अावाहन आणि त्यानंतर गावात कामाचा धडका सुरु झाला. शांतिवनच्या या मदतीमुळे गावकऱ्यांनी शांतिवनचे आभार मानले आहेत.
छावण्यांमध्ये मदत केंद्र
केवळ जलसंधारणच नाही तर शिरुर तालुक्यातील पाच ते सहा चारा छावण्यांवर शेतकऱ्यांनी शांतिवनने मदत केंद्र सुरु केले आहे. अन्नछत्र, आरोग्य सुविधा, समुपदेशन, प्रबोधन या मदत केंद्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
- दुष्काळ हद्दपार करण्यासाठी शांतिवनने आधी प्रकल्पात जलसंधारणाचे प्रयोग केले. त्याचे सकारात्मक परिणाम पाहून परिसरातील शेतकऱ्यांना शेततळी उभारुन दिली आणि आता परिसरातील गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेऊन कायम दुष्काळी असलेल्या शिरुर व गेवराईच्या काही गावांचा कायापालट करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे शांतिवन प्रकल्पाचे उपाध्यक्ष श्री सुरेश जोशी यांनी सांगितले.