पाटोदा:आठवडा विशेष टीम―वाटसरुला वाट, भुकेल्यांना अन्न आणि तान्हेल्यास पाणी देणारी आपली संस्कृती… पण चीन सारख्या विनाशकली विकृतीमुळे आज आपल्या संस्कृतीपुढे शरण जाताना माणूस दिसत आहे..!
करोनासारख्या संसर्गजन्य रोगाने आज जगभरात थैमान घातले आहे,दिवसेंदिवस रुग्णाच्या संख्येने व मृत्यूच्या अकड्या वाढ होताना दिसत आहे, आपलं महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे,आज गर्भश्रीमंत, नोकरदार, नेते,उद्योजक,सरकारी अधिकारी, नोकरदार वर्ग हा संपूर्ण नियमांचे पालन करून योग्य ती काळजी घेत आहे,आणि याच राज्यात असा एक असंघटित वर्ग आहे तो म्हणजे ऊसतोड कामगार गेले अनेक वर्षे या असंघटित वर्गाला अनेक समस्यांना संकटांना तोंड देताना आपण पाहिले आहे पण आज राज्यात गंभीर परिस्थिती आहे, पण या मजुरांना आरोग्य सुरक्षा व व्यवस्थापन करण्यासाठी आज सरकार,प्रशासन हतबल होताना दिसत आहे.
राज्य सरकारने पुकारलेल्या Lock down चे पूर्वनियोजन न केल्यामुळे राज्यच्या कोरडवाहू पट्ट्यातील म्हणजे बीड, अहमदनगर, जालना परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यातील २ लाखांवर ऊसतोड कामगार पश्चिमेला म्हणजे सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर या भागात साखर कारखान्यावर अडकले आहेत, आज राज्य शासन व सरकारपुढे मोठं आव्हान असताना या मजुरांचे व्यवस्थापन व नियोजन करण्यासाठी आज प्रश्नचिन्ह उभा राहते आहे, कारण आज देशात बंद असताना ऊसतोड कामगार ऊसाच्या फडात कसा..? साखर कारखाने बंद का होत नाहीत..? हे साखर कारखाने नेमके कुणाचे आहेत..? मजुरांना या रोगाची लागण होणार नाही का..? जसं सर्व लोक घरामध्ये आपल्या परिवारांसोबत एकत्र आहेत तसंच या कामगारांचे अर्धे कुटुंब लहान मुले, आई-वडील गावकडे आहेत,मग त्यांना सुद्धा माया ममता, आईच प्रेम असेल ना..? सरकारला यांची दयामाया का येऊ नये..?असे अनेक प्रश्न माझ्यासारख्या ऊसतोड मजुरांच्या मुलाच्या मनात उभे राहतात कारण या सर्व परिस्थितीला मी स्वतः कुटुंबासोबत सामोरे जात आहे.
आज सांगली जिल्ह्यातील कामगार राज्य शासनाने काढलेल्या निर्णयाचे उल्लंघन करून आपले गाव मिळेल त्या वाहनाने(साधनाने) दिसेल त्या आडवळणीच्या रस्त्याने गावाकडं येताना दिसत आहेत, या मजुरांची साखर कारखान्यावर ऊसतोडणीचे काम करताना जि फरपट असते त्यापेक्षा जास्त फरपट त्यांची आपल्या गावी आपल्या चुमुकल्यांच्या आशेने त्यांचे अश्रू अनावर होताना दिसत आहेत. राज्यभर सीमाबंदी असल्याने जागोजागी सीमा व रस्ते बंद केले आहेत,जिल्ह्यातील सीमेवर पोलीस चेकपोस्ट आहेत,या सर्वांना तोंड देत हे कामगार रात्रीचा दिवस करून गावापर्यत पोहचण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अनेक संकट येत आहेत काही गावात त्यांना शिवीगाळ हाणामारी व पोलिसांचा मार सहन करावा लागत आहे, पण हे सगळं गावाकडे जायच्या ओढीमुळे सहन करून मजल दरमजल करत मजुर आपल्या मायदेशी परतत आहे.
तो कामगार आपल्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या गावच्या सीमेवर पोहचतो की नाही तोच प्रशासन प्रशासक वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे.त्यांना गावाबाहेर थांबवले गेले आहे, काही ठिकाणी खुप गैरसोय होत आहे,जेवणाचा प्रश्न उद्भवत आहे,वैद्यकीय अधिकारी त्यांच्यापर्यंत जायला तयार नाहीत, गावकरी त्यांना गावात घ्यायला तयार नाहीत, अन वरून पोलीस प्रशासन त्यांना सुरक्षा व व्यवस्थापन करण्यासाठी तयार नाही.
यांच्या पाचवीला पुंजलेली आयुष्याची फरपट अन पोटाला चिमटा हे काही नवीन नाही,नेमही सरकार बदलत आहे, पण माणसं तीच आदलून बदलून दिसत आहेत, काय कुणास ठाऊक या कामगारांना न्याय कधी मिळणार आहे अन यांच्या पाचवीला पुंजलेला अन्याय, अत्याचार, संघर्ष, प्रयत्न पराकाष्ठा, कधी संपणार आहे…”
शब्दांकन–इंजि.दत्ता बळीराम हुले (ऊसतोड मजुर पुत्र)