मुंबई:आठवडा विशेष टीम― मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेरीस विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्याने ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार? याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.आज दुपारी १ वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर त्यांना विधानपरिषद सदस्यत्वाचं प्रमाणपत्रंही देण्यात आलं. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या. कोणताही गाजावाजा न करता मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. उद्धव ठाकरे यांनी २७ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कोणत्यातरी सभागृहाचं सदस्य होणं बंधनकारक होतं. २७ मे रोजी सहा महिने पूर्ण होत असल्याने त्यापूर्वीच ते विधानपरिषदेचे सदस्य झाल्याने मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला आहे. करोनाच्या संकटामुळे विधानपरिषदेची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती.
0