अहमदनगर जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

कुणाला दाबून आयुर्वेद कॉलेजवर अतिक्रमण केले?―डॉ सुजय विखेंचे जगताप यांच्यावर टीकास्त्र

अहमदनगर: कोणत्या वैचारिकतेचा खासदार लोकसभेत पाठवयचा, त्याचा अभ्यास पाणी प्रश्‍नावर किती? खासदाराने काय काम केले पाहिजे? दोन उमेदवारांपैकी कोण कामाला येऊ शकतो, याची चर्चा निवडणुकीत व्हायला पाहिजे. माझ्यावर अतिक्रमणाचे आरोप केले जात आहेत. मात्र, दमदाटीने बळकावण्याला अतिक्रमण म्हणतात. तुम्ही चालवलेल्या आयुर्वेद कॉलेजवर कुणाला दाबून अतिक्रमण केले? याचे उत्तर तुम्ही लोकांना दिले पाहिजे, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधी उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्यावर नामोल्लेख टाळून टीका केली आहे.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  अहमदनगर तालुक्याच्या प्रचारदौर्‍यावर असलेल्या विखे पाटील यांनी सोनेवाडी, चास, कामरगावनंतर अकोळनेर, भोरवाडी, सारोळा कासार आदी गावात मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, तुम्ही ठामपणे सांगा की हे कॉलेज आमच्या आजोबांनी, वडिलांनी उभे केले. ते कुणाचे होते? कुणी उभे केले? संस्था कुणी सुरू केली? संस्था सुरू होत असतांना तुम्ही कसे त्यात अतिक्रमण केले? अतिक्रमण केल्यावर कसा त्यावर संपूर्ण ताबा मिळवला? असे सवाल त्यांनी उपस्थित करत माझ्यावर अतिक्रमणाचे आरोप करण्याआधी जनतेला याची उत्तरे तुम्ही दिली पाहिजेत, असे ते म्हणाले.
  कॉलेज वाढविण्याऐवजी फक्त पक्षाचे कार्यालय म्हणून चालवले. हे पाप आम्ही केले नाही. स्वतःच्या कर्तुत्वावर स्व.बाळासाहेब विखे पाटील, ना. राधाकृष्ण विखे पाटील, आम्ही स्वतः संस्था सुरू करुन जागा खरेदी केल्या. कॉलेजेस उभे केले. मुलांना शिकवले. कुणाच्या जागा आम्ही बळकावल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
  समोरचे उमेदवार बाहेरचा व घरचा यातच अडखळलेत. मात्र घरचा आणि बाहेरचा हा विषयच नाही. समोरचा उमेदवार २४ तास उपलब्ध असला तरी तुम्ही जाऊ शकता का? याचा विचार करा. तसेच नुसते उपलब्ध राहून काही होत नाही. कामे करता आली पाहिजेत. तुमची कामे झाली पाहिजेत. जनसेवेच्या माध्यमातून, आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून जनतेसाठीची माझी सेवा सुरूच राहणार आहे. दुष्काळी भागातील, जिरायत भागातील जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही करत आहोत. शेतकर्‍यांचे प्रश्‍न, मुद्दे महत्वाचे आहेत. मात्र, ते लोकसभेत मांडले गेले पाहिजेत. हे सर्व प्रश्‍न मांडण्यासाठी अभ्यासू, बोलता येणारा खासदार पाठवला पाहिजे. समोरचा उमेदवार विधानसभेत चार वर्षात फक्त चारच मिनिटे बोललाय, असे सांगत या सर्वांचा विचार करुनच जनतेने निर्णय घ्यावा, असे आवाहन डॉ. विखे पाटील यांनी केले आहे. यावेळी बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, बाळासाहेब पोटघन आदी उपस्थित होते.


  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.