बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेले व प्रलंबीत राहीलेले ७ स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी दिली आहे. काही वेळापुर्वीच बाकीचे २२ स्वॅब निगेटीव्ह आले होते. स्वॅब उशीरा येण्यामागे काहीतरी धाकधूक होतीच ती अखेर खरी ठरली. आता बीड जिल्ह्यात एकूण ९ जण पॉझिटीव्ह झाले आहेत.
पाहुण्यांचा वानवळा आज जे ७ पॉझिटीव्ह आढळून आले आहेत ते बीड जिल्ह्याचे रहीवाशी नाहीत. नगर जिल्ह्यातील पिंपळगाव खु. चे ते रहीवाशी आहेत. परंतु त्यांनी मुंबईहून येताना सुरक्षित जागी यायचे म्हणून सुनेचं माहेर असलेलं आष्टी तालुक्यातील सांगवी पठाण येथील पत्त्यावर पास मिळवला होता. १३ तारखेला त्यांनी जिल्ह्यात प्रवेश केला.जिल्ह्यात आल्यापासून ते शेतात वस्तीवर क्वारंटाईन होते. आशाप्रकारे बीड जिल्ह्याला पाहुण्यांकडून कोरोनाचा वानवळा मिळाल्याने बीडची कोरोनाग्रस्थ संख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. आज आढळलेल्या रुग्णात यात ६६, ६५, ४३, ३८, ३६, १०, ६ अशी त्यांचे वय असून पाच पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे.एकंदरीत यात वरील माहितीनुसार १० व ६ वयाच्या दोन बालकांचाही समावेश असल्याने चिंता वाढली आहे.
मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव खुडा येथील रहिवासी असलेले हे सातजण १३ मे रोजी मुंबईहून निघाले होते. १४ मे रोजी ते आष्टी तालुक्यातील सांगवी पठाण या गावी नातेवाईकांकडे आले होते. त्यांच्यात कोविड-१९ सारखी लक्षणे दिसून येऊ लागल्याने त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे आज रविवारी त्यांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. सायंकाळी आलेल्या अहवालात या सातही जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात आणखी खळबळ उडाली आहे.
आजचे कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बीड जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना सुरु केलेल्या आहेत.बीड जिल्हाला पुणे, मुंबई या मोठ्या लोकसंख्येच्या व कोरोना बधितांची संख्या जास्त असलेल्या शहरातून आलेल्या लोकांकडून मोठा धोका असल्याचे समोर येत आहे. आपल्या गावात ,वस्तीवर मुंबई, पुणे सह बाहेरजिल्ह्यातुन आलेल्या लोकांची माहिती प्रशासनानाला तात्काळ द्या.