धनगर समाजाच्या आरक्षणाचा दिवस आज पाच वर्षानंतरही उजाडला नाही- धनंजय मुंडे

माढातील काही मुलं खूपच गद्दार निघाली

माढा दि २०: आरक्षणाच्या नावाने राज्यातील धनगर समाजाची भाजपा सरकारने फसवणूक केली आहे. आता २३ तारखेला मतपेटीतून बदला घ्यायची वेळ आली असल्याचे असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले

स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांनी आज माढा मतदारसंघातील महाआघाडीचे दमदार उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारार्थ आज कुर्डुवाडी येथे सभा घेतली. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, रश्मीताई बागल उपस्थित होते.

माढा या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने डाव टाकला आहे. मात्र हा डाव उलथून टाकण्याची धमक संजय मामांमध्ये आहे. तुमच्या सर्वांच्या साथीने संजय मामांचं यश निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माढ्यातले काही मुलं तर खुपच गद्दार निघाली, घरातल्या माणसाला सोडून दुसऱ्यांचा हात धरला असा टोला त्यांनी लगावला. काय कमी केलं होतं पवार साहेबांनी यांच्यासाठी? इथली जनता राष्ट्रवादीवर, आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारी आहे. येत्या २३ मे रोजी माढ्यातली जनता सर्व हिशोब करणार असल्याचे त्यांनी वक्तव्य केले.

भाजपने २०१४ साली पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही सपनो को सौदागर दिला होता. या सौदागरने सर्वांना फसवले. भाजपने शेतकऱ्यांना फसवले, कष्टकऱ्यांना फसवले, दलितांना फसवले, धनगरांना फसवले. मुख्यमंत्र्यांनी बारामतीत सांगितले की भाजपला मतदान करा पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो. आज पाच वर्षे झाली तरी तो सोनेरी दिवस उजाडला नाही. यांनी आरक्षण तर दिलेच नाही उलट धनगर समाजाच्या आरक्षणाची फाईलच हरवल्याची कबुली कोर्टात दिली. फसवणीस सरकारचा बदला घेण्याची वेळ आली असल्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना दिले.

ज्या शहीद हेमंत करकरेंनी या देशासाठी बलिदान दिले, त्यांच्या विषयी अशी भाषा वापरणाऱ्या साध्वी प्रज्ञा सारख्या आरोपीस लोकसभेसाठी उमेदवारी देणाऱ्या भाजप सरकारला या निर्णयाची लाज वाटत नाही का असा सणसणीत सवाल त्यांनी केला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.