शेवगांवच्या सभेला अलोट गर्दी ; सुजय विखेंना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे केले आवाहन
शेवगांव (अहमदनगर) दि.२०: काॅग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत सत्तेच्या माध्यमातून केवळ जातीपातीचेच राजकारण केले, त्यांना सामान्य माणसाच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नव्हते. राष्ट्रवादीच्या या घाणेरड्या राजकारणाला सामान्य जनता वैतागली असून जातीपातीचे राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीचे घड्याळ आता बंद पडल्या शिवाय राहणार नाही अशी जोरदार टीका राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे.
शेवगाव जि. अहमदनगर येथे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी आ. मोनिका राजळे, बापूसाहेब पाटेकर, अविनाश वंगे, तुषार वैद्य, मोहनराव पालवे, मुकूंद गर्जे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचा जनतेच्या विकासाशी काही संबंध नाही. केवळ जातीच्या भिंती उभ्या करून राजकारण करायचे आणि सत्ता मिळवायची हाच त्यांचा उद्योग होता. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्या पासून त्यांच्या हा उद्योग मात्र यशस्वी होत नाही. पंधरा वर्षे गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न न सोडविणाऱ्या शरद पवारांनी पगडीवर टीका केली परंतु त्याच पगडीवाल्या मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिले हे त्यांनी लक्षात ठेवावे.
पवार साहेब, थोडं आमच्या भावालाही शिकवा
लोकनेते मुंडे साहेबांचा वारसा सांगत प्रचार करणा-या नेत्याचा ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात यावेळी चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या, हा माणूस कधी मुंडे साहेबांचा वारसा सांगतो तर कधी त्यांचेवर टीका करतो. दर दहा मिनीटाला याची भाषा बदलते. मुंडेंचा वारसा केवळ बोलण्याने ठरत नाही तर त्यांच्या विचाराने ठरतो. जो वंचितांसाठी काम करतो तो इथे बसलेला प्रत्येक जण त्यांचा वारसा आहे. पवार साहेब, राजकारण करत असताना तुम्ही
स्वतःचं घर सुरक्षित ठेवलं आहे. इकडे आमचा भाऊ मात्र तुमच्या तालमीत राहून आम्हाला संपवायला निघाला आहे त्यामुळे पवार साहेब, आमच्या भावालाही थोडे शिकवा असे ना. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या.
कायदे मोडणारा नाही तर कायदे बनवणारा व्यक्ती संसदेत गेला पाहिजे
देशाच्या संसदेत कायदे मोडणारा नाही तर कायदे बनवणारा व्यक्ती गेला पाहिजे. डॉ . सुजय विखे हे सुशिक्षित समजदार असल्याने प्रत्येक मताला न्याय देऊ शकतील असे म्हणत केंद्रात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात सत्ता प्रस्थापित करायची असून तुम्ही दिलेले मतदान थेट नरेंद्र मोदी यांना मिळणार आहे . मोदींच्या हाती देश सुरक्षित असून जे कुणीच केले नाही ते नरेंद्र मोदी यांनी केले आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत राज्यातील 3 लाख लोकांना घरकुल मिळाले आहे. उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅस आले असून सौभाग्य , जनधन अशा गरिब वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या योजना केंद्र सरकारने राबवल्या आहेत आणि म्हणून हे सरकार गोर गरिबांच्या हिताचे आहे. गोर गरीब सामान्य व्यक्तींच्या उत्कर्षासाठी काम करणारे हे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सत्तेत बघायचे असेल तर डॉ.सुजय विखे यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.