उस्मानाबाद दि.२०: जिल्ह्यातील नळदुर्गच्या किल्ल्यात बोटीतील वजन वाढल्याने ती पाण्यात उलटून यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दि. २० सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास किल्ल्यातील बोरी नदीच्या पात्रात घडली. मृतातील तीन जणांमध्ये २ मुलींचा व १ मुलाचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेत ३ बालकांचा मृत्यू झाल्याने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर माहिती अशी की, एहसान नय्यरपाशा काझी हे आपल्या नातेवाईकांना घेवून किल्ल्यातील नदीपात्रात बोटींग करण्यासाठी गेले होते. दरम्यान, बोटमध्ये बसून बोटींगचा आनंद घेत असताना बोटीच्या पुढील बाजूचा भार वाढल्याने बोट पाण्यात उलटली. याची माहिती कळताच किल्ल्यात उपस्थित आसलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाण्यात जाऊन सात जणांना बाहेर काढण्यात यश मिळविले.
परंतु,बोटीतील सानीया फारुक काझी (वय ७), इजान एहसान काझी (वय ५, रा. नळदुर्ग) हे चुलत बहीण भाऊ पाण्यात बुडून मृत्यू पावले तर यामधील अलमाज शफीक जहागिरदार (वय १२, रा. मुंबई) हिला उपचारांसाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर उपचारां-दरम्यानमृत्यू झाला.