बीड जिल्हासामाजिक

शारदा प्रतिष्ठानचा २१ वा नेत्रदिपक सामुहिक विवाह सोहळा २८ एप्रिलला संपन्न होणार―अमरसिंह पंडित

दुष्काळी स्थितीत अनावश्यक खर्चास फाटा देत विवाह नोंदणी करा

बीड (शेख महेशर): शारदा प्रतिष्ठानचा २१ वा सामुहिक विवाह सोहळा यावर्षी रविवार, दि. २८ एप्रिल २०१९ रोजी सायं.०६:३५ या गोरज मुहूर्तावर जयभवानी मंदिर परिसर, शिवाजीनगर, गढी येथे असंख्य वर्‍हाडींच्या उपस्थितीत नेत्रदिपक विवाह सोहळा सर्वांच्या साक्षीने संपन्न होणार आहे. आजमित्तीला मराठवाड्यामध्ये दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता वधु - वर माता-पित्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत या सोहळ्यात विवाह नोंदणी करण्याचे आवाहन शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाहक अमरसिंहजी पंडित यांनी केले आहे.
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणार्‍या शारदा प्रतिष्ठान गेवराई या स्वयंसेवी संस्थेने मागील वीस वर्षांपासून अखंडीतपणे सामुहिक विवाह सोहळ्याचे नेत्र दिपक आयोजन केलेले आहे. आज वर सुमारे १८०० हून अधिक दांपत्यांचे विवाह या सामुहिक विवाह सोहळ्यात संपन्न झालेले आहेत. या वर्षी शारदा प्रतिष्ठानचा हा २१ सामुहिक विवाह सोहळा असून येत्या रविवार, दि.२८ एप्रिल २०१९ रोजी सायं. ०६.३५ च्या गोरज मुहूर्तावर जयभवानी मंदिर परिसर, शिवाजीनगर, गढी येथे हजारो वर्‍हाडी मंडळींच्या उपस्थितीत आणि ब्राम्हणवृंदांच्या साक्षीने मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा आयोजित केल्याची माहिती देण्यात आली आहे. शारदा प्रतिष्ठान कडून अतिशय नेत्रदिपक आणि शिस्तीमध्ये या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. सध्या मराठवाड्यात भिषण दुष्काळ निर्माण झाला आहे. जनावरांच्या चार्‍याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे, अशा स्थितीत सुजान नागरीकांनी वधु - वर माता - पित्यांनी लग्नापोटी होणारा अनावश्यक खर्चाला फाटा देत सामुहिक विवाह सोहळ्याच्या कार्य सोहळ्यातच विवाह लावावा. या मध्ये सहभागी होणार्‍या वधु - वरांचा पूर्ण पोशाख, पादत्राणे या सह सोन्याचे मणीमंगळसुत्र आणि संसार उपयोगी साहित्यांचा संच प्रतिष्ठान कडून नवदांपत्यांना दिला जातो. वर्‍हाडी मंडळींना सुरुची भोजनाची व्यवस्था प्रतिष्ठान कडून केली जाते. दृष्ट लागावी असा हा विवाह सोहळा पार पाडला जातो. या वर्षीच्या २१ व्या सामुहिक विवाह सोहळ्यात नवदांपत्यांनी आपली नोंदणी लवकरात लवकर करावी असे आवाहन प्रतिष्ठानचे कार्यवाहक अमरसिंहजी पंडित यांनी केले आहे.
शासना कडून सामुहिक विवाह सोहळ्या साठी दिले जाणारे प्रोत्साहनपर अनुदान संबंधितांना प्रतिष्ठान कडून दिले जाते, या कामी प्रतिष्ठान शासन स्तरावर वैयक्तिक पाठपुरावा करते. वर्‍हाडी मंडळींचे भोजन, नवदांपत्य वधु - वरांची वाजत गाजत मिरवणुक, नेत्र दिपक फटाक्यांची आतिषबाजी, धार्मिक पध्दतीने विधीवत होम हवन यांसह इतर धार्मिक संस्कार आणि साधु संत-महंत यांचे वधु - वरांना आशिर्वाद हे सामुहिक विवाह सोहळ्याचे खास वैशिष्ट्य आहे. अखंडपणे गेली वीस वर्षे सामुहिक विवाह सोहळ्याचे शानदार आयोजन व नियोजन करणारे शारदा प्रतिष्ठान ही मराठवाड्यातील एकमेव स्वयंसेवी संस्था आहे. या प्रतिष्ठानचे कार्यवाहक अमरसिंहजी पंडित यांचा शासनाने या कामी गौरव देखील या पूर्वीच केलेला आहे. आज वर सुमारे ३१ विवाहांची नोंदणी झालेली असून तात्काळ आपली नोंदणी करावी, सदरील विवाह नोंदणी कार्यालय जगदंबा आय.टी.आय. परिसर, गेवराई येथे सुरु असल्याचेही प्रतिष्ठान कडून कळविण्यात आले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.