राजकारणराष्ट्रीय

नरेंद्र मोदींना संपविण्याचा विरोधकांचा डाव हाणून पाडा―ना.पंकजाताई मुंडे

देशाच्या विकासाला प्राधान्य देण्याऱ्या भाजप-सेना महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा

शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ नेवासा येथील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिर्डी दि.२४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोरगरीबांविषयी खरा कळवळा आहे, कारण त्यांनी स्वतः गरीबी अनुभवली आहे. मागील पांच वर्षात त्यामुळेच त्यांनी अनेक योजना त्यांच्यासाठी राबविल्या व प्रत्यक्ष लाभही मिळवून दिला, त्यांचे काम पाहून हवालदिल झालेले विरोधक त्यांना संपविण्यासाठी एकत्र आले आहेत, विरोधकांचा हा डाव या निवडणुकीत हाणून पाडा असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ नेवासा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर उमेदवार सदाशिव लोखंडे, आ. बाळासाहेब मुरकूटे, आ. नरेंद्र दराडे, सचिन देसरडा, दिनकर गर्जे, मच्छिंद्र मस्के, राजू किर्तने आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, कोणत्याही भागाचा विकास करायचा असेल तर जनतेची साथ तितकीच महत्वाची असते. माझ्याकडे असलेल्या ग्रामविकास, जलसंधारण, रोजगार हमी व महिला बालविकास या खात्याच्या माध्यमातून अनेक योजना राबवून सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, मुलभूत विकास निधी (२५१५), जलयुक्त शिवार आदी योजना राबवून तळागाळापर्यंत विकास पोहोचविला. लोकांपर्यंत विकास जावा यासाठी हया योजना होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीबीतून पुढे आलेले नेते आहेत, त्यामुळे गरीब व गरीबी याविषयी त्यांना खूप तळमळ आहे, म्हणूनच उज्ज्वला गॅस, जनधन योजना, सौभाग्य योजना, शौचालय, घरकुल, स्वच्छता अभियान यासारख्या योजना त्यांनी यशस्वरित्या राबवल्या. प्रत्येक योजनेचा लाभ गरीबांना मिळावा यासाठी मधली दलाली त्यांनी बंद केली. प्रधानमंत्री आवास योजनेचे तीन लाख घरकुलाच्या चाव्या याच शिर्डीतून त्यांनी दिल्या. आणखी सहा लाख घरांना मंजूरी मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग यातून विकासाला गती दिली. केवळ एवढ्यावरच न थांबता शेतक-यांच्या भल्याचे अनेक निर्णय त्यांनी घेतले. कर्जमाफी, विमा, हमीभाव, निवृत्ती वेतन, विविध स्वरूपाचे अनुदान यातून त्यांनी शेतकरी वर्गाला न्याय दिला असल्याचे त्या म्हणाल्या.

महाखिचडीचा म्होरक्या कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीबांचे कल्याण करण्याबरोबरच देशाच्या सुरक्षेचाही विचार करत आहेत. सर्जिकल स्ट्राईक करून शत्रु देशाला त्यांनी धडकी भरवली आहे. असे असताना मोदींना संपविण्यासाठी काॅग्रेससह सर्व विरोधक एकत्र आले आहेत. आमचा कणखर नेता मोदी आहे पण विरोधकांची जी महाखिचडी झाली आहे, त्यांचा म्होरक्या कोण? हे मात्र अजूनही ठरलेले नाही त्यामुळे केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधकांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या व सदाशिव लोखंडे बहुमतांनी लोकसभेत पाठवा असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले. सभेला मतदारसंघातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.