भाजपला जातीयवादी म्हणणारेच खरे जातीयवादी―पंकजा मुंडेंचा प्रहार

शिरूर मधून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजय कुणीही रोखू शकणार नाही

पुणे दि.२४: भाजप-शिवसेनेला जातीयवादी पक्ष म्हणून टीका करणारेच खरे जातीयवादी आहेत, समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम काॅग्रेस व राष्ट्रवादीनेच केले आहे, असा जोरदार प्रहार राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केला. शिरूर मधून शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजय कुणीही रोखू शकणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत त्या बोलत होत्या. आ. योगेश टिळेकर, अक्षय आढळराव पाटील, महादेव बाबर, रंजना टिळेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश गोंडे, समीर तुपे, संगीता ठोसर आदींसह महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

काॅग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा जनतेच्या विकासाशी काही संबंध नाही. केवळ जातीच्या भिंती उभ्या करून राजकारण करायचे आणि सत्ता मिळवायची हाच त्यांचा उद्योग होता. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्या पासून त्यांचा हा उद्योग मात्र यशस्वी होत नाही. ही मंडळी आमच्यावर जातीयवादी म्हणून टीका करतात परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना सुरक्षित ठेवलं. आज त्यांच्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक स्वतःला सुरक्षित समजत आहे. आम्हाला जातीयवादी म्हणणारेच खरे जातीयवादी आहेत असे ना. पंकजाताई म्हणाल्या.

सर्जिकल स्ट्राईक वर शंका कशासाठी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक करून शत्रू राष्ट्राला आक्रमक उत्तर दिले आहे, असे असताना विरोधक मात्र यावर प्रश्नचिन्ह उभे करून आपल्या शुरवीर जवानांचा अवमान करत आहेत. देशाच्या सुरक्षेवर त्यांनी शंका उपस्थित केल्यामुळे आम्हाला प्रचारात तो मुद्दा घ्यावा लागत आहे. माझा कोणावर वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नव्हता, परंतु देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खपवून घेतली नाही असे त्या म्हणाल्या.

पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मागील पांच वर्षाच्या कारकिर्दीत गोरगरीब व सर्व सामान्य माणसाचाच विचार केला आहे. घरकुलाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या डोक्यावर छत, घरोघरी शौचालय, उज्वला गॅस, सौभाग्य योजनेतून वीज आदी अनेक योजना राबवून त्यांनी सामान्यांचे कल्याण केले आहे. मोदी पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत. या निवडणुकीत विकासाचा मुद्दा बाजूला पडून कांग्रेस-राष्ट्रवादीने जातीचे राजकारण पुढे आणले आहे, त्यामुळे त्यांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे. सभेला परिसरातील मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.