आळंदी/भोसरी दि.२४: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे शिवसेनेची स्थापना झाली पण यांना साधा शिवरायांच्या जन्मस्थळाचा विकास करता आला नाही? इथल्या खासदार आढळरावांनी माऊलींची शपथ घेऊन या भागात पाणी आणण्याचे आश्वासन दिले होते. आजही माझ्या भगिनी पाण्यासाठी वणवण फिरतात. माऊलींची खोटी शपथ घेताना यांना लाज कशी वाटत नाही ? असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांची बुधवारी सायंकाळी आळंदी व भोसरी येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
२१व्या शतकात छत्रपतींचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आणणाऱ्या डॉ. कोल्हेंना शिरूरचे नाव विकासाच्या नकाशावर आणण्यासाठी संतांच्या भूमीतून आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी केले.
गेली १५ वर्षे येथील शिवसेनेचे खासदार कधी ‘आढळलेच’ नाही. या भागात छत्रपतींची शिवनेरी आहे, शंभूराजांची समाधी आहे, भिमा-कोरेगाव आहे. पण या प्रेरणास्थळांचा विकासही त्यांना करता आला नाही. या संतांच्या भूमीची परंपरा यांना जपता आली नाही त्यांना मतदान करणार का ? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.
देशाचे पंतप्रधान मोदी दिवसाआड राज्यात येऊन प्रचारसभा घेत आहेत. पवारसाहेबांवर टीका करत आहेत. शिरूर मतदारसंघात तर इतकी धडकी भरली आहे की 10 मंत्र्यांची सभेसाठी रीघ लागली आहे. मोदींना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही डोनाल्ड ट्रम्पला जरी बोलावले तरी आमच्या शिवरायांचा मावळाच अमोल कोळेच विजयी होणार असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
यावेळी जेष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील, आ. दिलीपराव सोपल, माजी आमदार दिलीप लांडे, दिलीप अण्णा मोहिते आदी उपस्थित होते.