देशाच्या विकासासाठी पुन्हा मोदी सरकार येणे आवश्यक
मानखुर्द, घाटकोपरला झंझावाती जाहीर सभा
मुंबई दि.२५: जातीवादाच्या भिंती उभा करून समाजा – समाजात तेढ निर्माण करणारी काॅग्रेस आणि राष्ट्रवादीला या निवडणुकीत नेस्तनाबूत करा असे सांगून देशाचा विकास आणि सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेवर येणे आवश्यक आहे, त्यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.
ईशान्य मुंबई मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ मानखुर्द व घाटकोपर येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाशिव खोत, संजय उपाध्याय, गौतम सोनवणे, रविंद्र खोत आदींसह महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, सत्तर वर्षे ज्यांच्या हातात सत्ता होती, त्यांनी काय केले? अजूनही गरीबी हटावचे नारे ते देत आहेत. देशाच्या नागरिकांना विकास देण्याऐवजी जातीपातीच्या भिंती उभारण्याचे काम त्यांनी केले. काॅग्रेस ही ब्रिटिशांनी अवलाद असून त्यांचे पिल्लू राष्ट्रवादीची त्यांना साथ आहे, हे दोघे मिळून देशाला खा-खा खाल्ले, त्यांनी केलेले खरकटे काढण्यातच आमचा वेळ जात आहे. आमची जात विकासाची आहे, मोदी सरकारने पांच वर्षात केलेल्या विकासाची झलक तुम्ही बघितली आता विकासाचा महामेरू बनविण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेवर येणे आवश्यक आहे. संविधान बदलण्याची खोटी अफवा पसरवून सर्व सामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम ही मंडळी करत आहे त्यामुळे या निवडणुकीत जागा दाखवा, त्यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. सभेला परिसरातील मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.