प्रज्ञाभारती वर्णेकरांचा आदर्श तरुणांनी घ्यावा – स्वामी गोविंदगिरी

जन्मशताब्दीनिमित्त संस्कृत व्याख्यानमालेचा समारोप

पुणे दि.२८: “प्रज्ञाभारती श्री. भा. वर्णेकर हे युगपुरुष होते. ‘संस्कृतात्मा’ या शब्दात त्यांचे वर्णन करता येईल. महाकाव्य, संगीतिका, नाटक, कोशवाङ्मय अशा साहित्याच्या सर्व क्षेत्रांत त्यांचा अनिर्बध संचार होता. ते देशभक्त योगी होते. संस्कृत संवर्धनासाठी त्यांनी आजीवन प्रयत्न केले,” असे गौरवोद्गार पू. स्वामी गोविंदगिरी यांनी काढले.
श्री. भा. वर्णेकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने संस्कृत भारती व गीता धर्म मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेले वर्षभर संस्कृत व्याख्यानमाला चालविण्यात आली.या व्याख्यानमालेत दर महिन्यातून एक अशी विविध प्रचलित विषयांवर संस्कृतमधून व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वामी गोविंदगिरी बोलत होते. संस्कृत भारतीचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख शिरीष भेडसगांवकर आणि गीता धर्म मंडळाचे डॉ. मुकुंद दातार यावेळी उपस्थित होते.
या समारोप कार्यक्रमात वर्णेकरांच्या साहित्यातील विविध पैलूंवर परिसंवाद झाला. यावेळी अर्वाचीन संस्कृत साहित्यात डॉ. वर्णेकरांचे योगदान या विषयावर पं. वसंतराव गाडगीळ यांनी, डॉ. वर्णेकरांची काव्यसृष्टी या विषयावर डॉ. श्रीनंद बापट यांनी, ‘शिवराज्योदयम्’ महाकाव्य या विषयावर डॉ. परशुराम परांजपे यांनी, संस्कृतकोष वाङ्मयात वर्णेकरांचे योगदान या विषयावर डॉ. प्रसाद जोशी यांनी आणि डॉ. वर्णेकरांची संगीतिका या विषयावर डॉ. जाह्नवी बिदनूर यांनी आपली मते मांडली. डॉ. चन्द्रगुप्त वर्णेकर हे या परिसंवादाचे अध्यक्ष होते.
“प्रज्ञाभारती वर्णेकर ‘मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे। अलौकिका नोहावे लोकाप्रति’ असा त्यांचा व्यवहार होता. संस्कृत साहित्याचा कोश लिहिल्यावर त्यांना १० लाख रुपये देऊ करण्यात आले होते. त्यावर संस्कृत कार्यासाठी पैसे घ्यायचे नाहीत, मी हे कार्य सेवाव्रत म्हणून करतो असे त्यांनी सांगितले होते,” अशी आठवण सांगून वर्णेकरांच्या संस्कृतनिष्ठेचे भावपूर्ण वर्णन स्वामीजींनी केले. त्यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा, असे ते म्हणाले.
डॉ. ल. का. मोहरीर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. दातार यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.