सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― झोक्यात झोपलेल्या बालकाला घरात घुसून कोल्ह्याने उचलण्याच्या प्रयत्नात पोटावर गंभीर चावा घेवून सोमवारी रात्री जखमी केले तर मंगळवारी पहाटे पुन्हा तिघा बालकांना या कोल्ह्याने शिकार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना निंबायती ता.सोयगाव गावात मंगळवारी उघडकीस आली यामुळे निंबायती परिसरात खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने निंबायती गावालगत जाळे लावून कोल्हयाला पकडण्याची मोहीम हाती घेतली परंतु रात्री उशिरापर्यंत चतुर कोल्हा वनविभागाच्या हाती लागला नव्हता.
डोंगर रांगांतून भरकटून आलेल्या कोल्ह्याने निंबायतीगाव ता.सोयगाव येथे सोमवारी सायंकाळी अचानक प्रवेश करून सोमवारी झोक्यात झोपलेल्या उमैय्या जुनेद तडवी(वय ३)या बालिकेला उचलून घेण्याच्या नादात घरातील कुटुंबीयांनी जागे होऊन या कोल्ह्याला हुसकावून लावले असता या बालिकेच्या पोटाला चावा घेतला असून मंगळवारी पहाटे पुन्हा अंगणात खेळणाऱ्या फैजाब अकिल तडवी(वय १४)अक्सद मुक्तार तडवी(वय १३)या दोन बालकांसह रसूल उसुफ तडवी(वय २२)या तरुणाला कडाडून चावा घेतला आहे.कोल्ह्याच्या हल्ल्यात चौघे जखमी झाले असून त्यांचेवर जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या पवार,अलकाबाई लिमकर यांनी उपचार केले.दरम्यान दुपारपर्यंत कोल्ह्याने निंबायती गावात धुमाकूळ सुरु ठेवला असता,काही ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्यांनी या कोल्ह्याला हुसकावून लावले असता कोल्ह्याचा मुक्काम गावालगतच्या कपाशीच्या शेतात हलविला होता.तातडीने वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले परंतु चतुर कोल्ह्याने सायंकाळपर्यंत वनविभागाला चकमा दिला होता.
कोंबड्या पळविल्या-
सदर भरकटून गावात आलेल्या कोल्ह्याने गावातील एजाज तडवी,जमील तडवी या दोघांच्या सात कोंबड्या पळविल्या असून या कोल्ह्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.