पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांची संवेदनशीलता!
बीड दि.०१: राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे हया नेहमीच लहान मुलांच्या बाबतीत माऊलीच्या अंतःकरणांने सजग आणि जागरूक असतात, त्यांची संवेदनशीलता आज पुन्हा एकदा दिसून आली. दोन दिवसांपूर्वी शहरा नजीक काटेरी झुडूपात आढळून आलेल्या ‘ त्या ‘ अर्भकाच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी त्यांनी आज जिल्हा रूग्णालयात धाव घेऊन तिच्या तब्येतीची चौकशी करत काळजी घेण्याच्या सूचना डाॅक्टरांना केल्या.
महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणाचा जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रम संपताच पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. तालुक्यातील कपीलधार वाडी येथे एका बाभळीच्या काटेरी झुडूपात सोमवारी दोन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक जिवंत आढळून आले होते. ही बाब कांही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या बाळाला तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डाॅक्टरांनी उपचार केल्यामुळे त्या बाळाची तब्येत सध्या धोक्याबाहेर आहे.
पालकमंत्र्यांची संवेदनशीलता
पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांना सोमवारी ही घटना समजताच त्यांनी डाॅक्टरांना त्या बाळाची काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. पोलिसांना देखील निर्दयी मातेचा शोध घेण्यास सांगितले होते. आज बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी रूग्णालयात जावून त्या बाळाच्या तब्येतीची मोठ्या मायेने चौकशी केली, तिच्या औषधोपचाराची काळजी घ्या, हयगय करू नका असे त्यांनी सांगितले. या प्रसंगाने त्यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली.
ताज्या बातम्यांसाठी आठवडा विशेष न्यूज App डाउनलोड करा.