अंबाजोगाई (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील सिंदफणा नदी पाञात अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी केंद्रांवर मंगळवार,दि.9 एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून तब्बल 62 हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.
देशात सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे.त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गेल्या दोन महिन्यांपासून वतीने धाडी टाकण्यात येत आहेत.आता पर्यंत आठ ते नऊ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला.तसेच अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले.राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागातर्गंत वडवणी, केज,माजलगाव, धारूर,परळी, अंबाजेागाई हे तालुके येतात त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या अवैध दारू विक्री, हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे.याच कारवाई अंतर्गत माजलगाव तालुक्यातील सिंदफना नदी पाञात हातभट्टी दारू केंद्रांवर गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकण्यात आली.यात दारू तयार करण्याचे 2565 लिटर रसायन,135 लिटर ताडी,15 बॅरल,दोन टोपली, यासह एकुण मिळून सुमारे 62 हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो तात्काळ जागेवरच नष्ट करण्यात आला.या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड,कॉन्स्टेबल बी.के.पाटील व वाहनचालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.