पाटोदा दि.०१:आज १ मे महाराष्ट्र दिन यादिवशी नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले आहेत. शिवाय चालकाचाही मृत्यू झाला.शहिदांमध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील शेख तौशिफ आरिफ यांचा समावेश आहे. शहिदांच्या यादीत नाव बघताच संपूर्ण जिल्ह्याचे डोळे या शहिदासाठी पाणावले आहेत.
नक्षलवाद्यांनी भुसुरुंग लावून हा हल्ला गडचिरोली जिल्ह्यात घडवून आणला होता. नक्षली हल्ल्यातील शहिदांची यादी काही वेळापूर्वी जाहीर करण्यात आल्यानंतर यामध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील शेख तौशिफ आरिफ यांचे देखील नाव होते.अत्यंत हलाखीच्या परिस्थितून ते पोलीस दलात रुजू झाले. त्यांचे वडील आरिफ शेख हे हॉटेल कामगार आहेत तर आई शेतमजूर आहेत. तौसिफ यांना एक भाऊ आहे. पाटोदा येथील क्रांती नगर येथे त्यांचे घर आहे. तौसिक यांच्या जाण्याने कुटुंबासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.