परळी शहराला खडक्यातून पाणी द्या ; चांदापूरातून नविन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करा―धनंजय मुंडे

बीड दि.०१: परळी शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वाण धरणातील पाणीसाठा जवळपास संपल्याने परळीकरांसाठी खडका येथील बंधार्‍यातून पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच चांदापूर येथील पाझर तलावातून तातडीची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून, परळी शहराचा पाणी प्रश्‍न सोडवावा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

परळीतील पाणी टंचाईच्या गंभीर झालेल्या पाण्याच्या प्रश्‍नासंदर्भात त्यांनी आज जिल्हा प्रशासनाची भेट घेतली. जिल्हाधिकार्‍यांशी प्राथमिक चर्चा केल्यानंतर त्यांनी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना सविस्तर पत्र दिल, ते खालीलप्रमाणे मागण्या आहेत.

परळी शहराची लोकसंख्या आणि शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वाण प्रकल्पातील अत्यल्प पाणीसाठा पाहता मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असून, शहराला 10 दिवसातून एकवेळेला पाणी पुरवठा करण्याची वेळ पालिकेला आली आहे. परळी शहरास दैनंदिन लागणार्‍या पिण्याच्या पाण्यासाठी स्त्रोत्र असणार्‍या वाण धरणात आज रोजी केवळ 0.71 टक्के (0.534 द.ल.घ.मी.) पाणी साठा उपलब्ध असून, मृत साठा 0.13 इतका आहे. धरणातील पाणी पातळी खुप खोल गेलेली असल्याने सद्यस्थितीत जो पाणी पुरवठा करण्यात येत आहे, तो धरणातील जॅक्वील मध्ये येणार्‍या पाण्यासाठी चर खोदून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हा पाणीसाठाही जून 2019 च्या सुरूवातीसच संपण्याचा अंदाज असल्याने या पुढील काळात भिषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. परळी शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी टंचाई आराखड्यात समावेश करून टँकर मंजुरी देणे.

शहरातील पाणी टंचाईच्या अनुषंगाने पर्यायी उपाय म्हणुन खडका येथील औष्णिक विद्युत केंद्रास पाणी पुरवठा करणार्‍या बंधार्‍यातून नगर परिषदेस पाणी पुरवठा करता येणे शक्य आहे. सद्या या प्रकल्पात 1.4 एम.एम. थ्री. एवढे पाणी उपलब्ध आहे. तसेच चांदापूर येथील पाझर तलावातून तातडीची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून पाईपलाईनचे काम करून घेतल्यानंतर शहरात संभाव्य पाणी टंचाई परिस्थितीतून मार्ग काढता येणे शक्य आहे. याशिवाय नविन वस्त्यांमध्ये टँकरनेही पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता असून, यासाठी पालिकेला वेगळ्या निधीची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे, आदी मागण्या त्यांनी केल्या.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.