पाटोदा दि.०३: महाराष्ट्र दिनी १ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यातील जांबुरखेडा गावातील नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ जवान शहीद झाले. या जवानांमध्ये पाटोदा शहरातील क्रांतीनगर भागातील रहिवासी असलेले शेख तौसीफ आरिफ हे जवान शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (ता.३) शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. शेख यांच्या अत्यंयात्राला सुरूवात झाली असून गावातील हजारोंचा जनसागर लोटला आहे.
आमदार सुरेश धस, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार भीमराव धोंडे आदी मान्यवर हे या अंत्ययात्रेत सहभागी झाले आहेत. तर पाटोदा शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तौसीफ शेख हे २०१० साली गडचिरोली पोलिसमध्ये शिपाई पदावर भरती झाले होते. दि.२६ एप्रिल २०११ मध्ये त्यांची गडचिरोली जिल्ह्यात नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या कार्यकाळात मोठा पराक्रम गाजवला होता. तब्बल सहा वेळा नक्षलवाद्यांशी झुंज देत तीन वर्षात पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. तौसीफ यांना पोलिस महासंचालक पदकाने गौरविण्यात आले होते. त्यानंतर पाटोदा शहरात त्यांचा मोठा सत्कार देखील करण्यात आला होता. मात्र नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात ते शहीद झाले. तौसीफ शेख यांच्या घरी आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.