शेत मजुरावर रानडुक्कराचा हल्ला ;घोसला येथील घटना

घोसला,दि.०७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― घोसला ता.सोयगाव येथे शेतात पिकांना खते देण्याचे काम करतांना अचानक रानडुक्करने शेतात प्रवेश करून शेतात काम करणाऱ्या मजुरावर हल्ला चढविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली या घटनेत शेतमजूर गंभीर जखमी झाल्याने त्याचेवर प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी जळगावला पाठविण्यात आले आहे.

चंद्रकांत एकनाथ बावस्कर(वय ४७) असे रानडुक्करच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेत मजुराचे नाव असून शेतात पिकांना खते देण्याचे काम करत असतांना अचानक शेतात आलेल्या चवताळलेल्या रान डुक्कराने त्याचेवर हल्ला चढवून त्यास चावा घेवून गंभीर जखमी केले आहे.या घटनेमुळे घोसला शिवारात शेत मजुरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून ऐन खरिपाच्या मशागतीच्या कामांमध्ये खीळ बसली आहे.शेती शिवारात रान डुक्कराचे कळप मोठ्या प्रमाणावर आहे त्यांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.