आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.०४:तालुक्यातील कवली आणि कंकराळा ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक टंचाई काळातही मुख्यालयी राहत नसल्याने या दोन गावांची टंचाई गंभीर झाली असून त्याचसोबत कवली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पंडित ढोले हे योजनाच्या लाभार्थ्यांची अर्थी पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून प्राप्त झाल्यावरून या तक्रारींच्या आधारे जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांनी दोन्ही ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचा लाभ देण्यासाठी कवली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पंडित ढोले लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करत असतात,कवली गावाला तीव्र पाणीटंचाईचं झळा सोसाव्या लागत असतांना संबंधित ग्रामसेवक मुख्यालयी हजर राहत नसल्याच्या तक्रारी महिनाभरापूर्वी कवली ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांचे कडे केल्यावरून पुष्पा काळे यांनी या तक्रारींच्या आधारे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना संबंधितावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली आहे.कंकराळा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गावात अंतर्गत राजकारण करून ग्रामस्थांना वेठीस धरतात या ग्रामसेवकाची अनेक दिवसापासून मनमानी सुरु असतांना तत्कालीन गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार केली असता त्यांनी कंकराळा ग्रामसेवकाला पाठीशी घातल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांनी केला आहे.कंकराळा ग्रामसेवकाची कामकाजात अनियमितता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून अद्यापही सर्वसाधारण सभेतील तक्रारीवर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.