विद्यार्थी मित्रांनो टीव्ही मोबाईल चा हट्ट सोडा आणि जीवनात मोठे व्हा -सुनील पाटील
पाचोरा (ज्ञानेश्वर पाटील): पाचोरा तालुका शिक्षण संस्थेच्या श्री सुपडु पाटील विद्या मंदिराचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या प्रांगणात काल दिनांक 15 रोजी सकाळी आठ वाजता संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे जेष्ठ शिक्षक अशोक परदेशी तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सुनील पाटील, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब बोरुडे प्रतिनिधी शिवाजी पाटील, सौ उज्वला बोरुडे व्यासपीठावर उपस्थित होते. श्री सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाल्यानंतर सर्वप्रथम पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विर भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . कृतिका देशमुख या शाळेतील विद्यार्थिनीने ईशस्तवन तर शाळेचे शिक्षक दीपक पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुनील पाटील यांनी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधतांना दूरदर्शन तसेच मोबाईल चा हट्ट न करता पुस्तकांशी मैत्री करून मनापासून अभ्यास केल्यास तुम्ही जीवनात मोठे अधिकारी व्हाल असे सांगितले. तसेच यावेळी बोलताना विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक करताना या शाळेत होत असलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वांगीण संस्कारक्षम उपक्रमाची प्रशंसा केली. प्रसंगी वर्षभरात शाळेमध्ये संपन्न झालेल्या विविध स्पर्धा परीक्षा,क्रीडा स्पर्धा ,आदर्श विद्यार्थी अशा सर्व क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक परदेशी कृउबा सचिव बाळासाहेब बोरुडे यांनी समयोचित विचार मांडले .सुत्रसंचलन संदीप वाघ यांनी तर सौ सारिका पाटील यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.