जालना : मराठवाडयासह जालना जिल्हयाची दुष्काळी परिस्थीती दाहकता लक्षात घेता माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन दुष्काळाची भयावह परिस्थिती लक्षात आणून दिली. यापुर्वीच खरीप व रब्बी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेलेले आहे.जालना जिल्हयातील अंबड-घनसावंगी तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची भिषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. नागरीकांना पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.परिसरात कोठेही पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरीक हवालदिल झाले आहेत.तसेच लाभक्षेत्रातील शेतामध्ये उभे असलेले ऊस पिक हातून जाण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे ऊसासाठी एक पाणी देणे आवश्यक आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यास शेतकरी व ग्रामीण भागातील जनतेस या भिषण दुष्काळामध्ये मोठा आधार मिळेल असे यावेळी आ.राजेश टोपे यांनी सांगितले.
आ.राजेश टोपे म्हणाले की,जायकवाडी धरणाचे एप्रिल अखेर पाणीसाठयाचा विचार केला असता 30 एप्रिल 2019 रोजी अखेर धरणामध्ये 668.591 दलघमी पाणीसाठा आहे.संभाव्य बाष्पीभवन तसेच औरंगाबाद महानगरपालीका,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व घरगुती पाणी वापर,जालना-अंबड व गेवराई शहरासाठी लागणारे पाणी अशा विविध कारणांसाठी राखून ठेवण्यात आलेले पाणी या सर्वांसाठी 162.00 दलघमी पाणी लागते.आजच्या पाणीपातळीपासून 453.50 मिटर पाणीपातळीपर्यंत 180.976 दलघमी जिवंत पाणी उपलब्ध असून 453.00 मिटर पाणी पातळीच्या खाली उचलण्या योग्य असलेले संपूर्ण पाणी योग्य नियोजन करुन वापरता येऊ शकते.
गोदावरी नदी काठावरील गावांना पिण्यासाठी तसेच डाव्या कालव्या अंतर्गत येणाऱ्या गांवाच्या पिण्याच्या पाण्यासाठी व एक वेळ शेतीसाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडणे,पाथ्री जि.परभणी शहरासाठी डाव्या कालव्यातून ढालेगाव के.टी.वेअरमध्ये पाणी सोडून पाणी प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन जायकवाडी धणातून डाव्या कालव्यातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडणेबाबत आ.राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री यांच्याशी याविषयी चर्चा करुन निवेदन दिले.