डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जाहिर व्याख्यान
अंबाजोगाई (प्रतिनिधी):अंबाजोगाई हे चळवळींचे माहेर घर आहे.या शहराने चळवळींना दिशा देण्याचे काम व नेतृत्व घडविण्याचे सातत्याने प्रयत्न केले आहेत. प्रस्थापित व्यवस्थेने बहुजन समाजात जो न्युनगंड निर्माण केला आहे.की,राजकारण हे चांगल्या व्यक्तींचे क्षेत्र नाही.तो सर्वार्थाने चुकीचा समज आहे. सत्ता प्राप्तीसाठी बहुजन समाजाकडे राजकीय साक्षरता हवी,सक्षम वैचारिक वारसा असलेले लोक यापुढे एकत्र आले पाहिजेत हाच मुख्य उद्देश ठेवून सामाजिक गुलामगिरी प्रमाणेच राजकिय गुलामगिरीतून मुक्ततेसाठी वंचित बहुजन आघाडी हा नवा राजकीय पर्याय लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने निर्माण झाला आहे.तेंव्हा बहुजन समाजातील तरूणांनी सक्रिय राजकारणात सहभागी झाले पाहिजे असे आवाहन प्रा.डॉ.यशपाल भिंगे यांनी केले.ते अंबाजोगाईत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते.
येथील जिवक प्रतिष्ठाण,अंबाजोगाई यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ.यशपाल भिंगे यांचे जाहिर व्याख्यान रविवार,दि.5 मे रोजी सायंकाळी 6 वाजता लोकनेते विलासराव देशमुख सभागृह, नगरपरिषद अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आले होते.व्याख्यानाचा “विषय-बहुजन समाज आणि राजकीय साक्षरता” असा होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मुजीब काझी हे होते. यावेळी विचारमंचावर प्रा.एस.के.जोगदंड,प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे,निमंत्रक डॉ.राहुल धाकडे या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानवांना अभिवादन करण्यात आले.प्रास्ताविक करताना निमंत्रक डॉ.राहुल धाकडे यांनी राजकारणातून जवळीकता साधता आली पाहिजे,भावनिक गोष्टींवर राजकारण नसावे,कार्यकर्ता घडला पाहिजे,संघटनात्मक शक्ती उभी करण्यासाठी प्रा.डॉ.भिंगे सरांचे व्याख्यान व मार्गदर्शन नव्या कार्यकर्त्यांना लाभावे हाच या उपक्रमाचा उद्देश असल्याचे डॉ.धाकडे यांनी नमुद केले.या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रा.एस.के. जोगदंड यांनी ‘आपलेच व्होट आपलीच नोट’ ही काळाची गरज असल्याचे सांगुन देशात बहुजन एकत्र येत आहेत.अॅड.बाळासाहेब आंबेडकरांनी देशभर प्रचार व प्रसार केला. राज्यात 48 लोकसभा मतदार संघात उमेदवार उभे केले.वंचित समाजामध्ये स्वाभिमान निर्माण झाला आहे.राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन प्रा.जोगदंड यांनी यावेळी केले. व्याख्याते प्रा.भिंगे यांचा परिचय प्रा.विष्णु कावळे यांनी तर उपस्थित पाहुण्यांचा परिचय डॉ.प्रमोद समुद्रे यांनी करून दिला.या प्रसंगी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी जिवक प्रतिष्ठाणच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी बोलताना व्याख्याते प्रा.डॉ.यशपात भिंगे यांनी राजकीय व सामाजिक सद्यस्थिती बाबत भाष्य केले.बौद्ध बांधवांनी ओबीसी, धनगर,माळी आदी समाजाचे वैचारिक प्रबोधन केले पाहिजे व प्रतिनिधित्व स्विकारले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांसाठी नव्हे तर देशातील सर्व समाज घटकांसाठी कार्य केल्याची माहिती देवून आज बहुजन समाज परिवर्तनाच्या वाटेवर आहे.असे सांगुन फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांचा देश निर्माण झाला पाहिजे. महाराष्ट्रात तत्वनिष्ठ राजकारणात उभे राहिले पाहिजे, लोकशाहीला श्रीमंत करणारी माणसे तयार केली पाहिजेत, भावनिकदृष्ट्या राजकारण करण्याचे प्रयत्न हाणुन पाडले पाहिजेत.राजकारणात वंचितांचे उमेदवार विजय झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. डोक्यामध्ये शेतकर्यांचे दुःख असणारा माणूसच शेतकर्यांचे प्रतिनिधित्व करू शकतो.राजकीय साक्षरता निर्माण झाली पाहिजे,तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञा-शिल-करूणा जपली पाहिजे,जाती धर्माच्या नावावर राजकारणात न करता विकासाच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे अशी अपेक्षा प्रा.डॉ.यशपाल भिंगे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा.अनंत कांबळे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार संतोष बोबडे यांनी मानले.या कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व परिसरातील शिक्षण, समाजकारण,साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निमंत्रक डॉ.राहुल धाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.अनंत कांबळे, भिमाशंकर शिंदे, विश्वास चोबे,रविंद्र केंद्रे,प्रा.विष्णु कावळे, डॉ.देवराव चामनर, डॉ.विनायक गडेकर, संतोष बोबडे, डॉ.विकास जाधव, डॉ.प्रमोद समुद्रे, प्रियदर्शी मस्के,अतुल ढगे,दिपक गुळभिले, सचिन राठोड आदींसहीत संयोजन समितीने पुढाकार घेतला.