स्वातीच्या बहिणीला शिक्षणासाठी ५० हजाराची मदत
वडवणी दि. ३१ :रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या स्वाती राठोड या शाळकरी विद्यार्थीनीच्या कुटूंबियांचे अश्रू पुसण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज सायंकाळी तिच्या घरी भेट दिली. ही घटना अतिशय क्लेशदायक असून यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिस अधिका-यांना त्यांनी सूचना दिल्या. स्वातीच्या बहिणीला शिक्षणासाठी ५० हजाराची मदतही त्यांनी यावेळी दिली.
स्वाती राठोड या शाळकरी विद्यार्थीनीने एका तरूणाच्या छेडछाडीला कंटाळून नुकतीच आत्महत्या केली होती. पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज संध्याकाळी वडवणी जवळ असलेल्या ब्रह्मनाथ तांड्यावर जाऊन स्वातीच्या कुटूंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. तिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल शिवाय तिच्यासोबत शिक्षण घेणा-या इतर मुलींना समुपदेशन करण्याचे आदेश त्यांनी पोलिस अधिका-यांना दिले. स्वातीच्या बहिणीला शिक्षणासाठी ५० हजाराची मदतही त्यांनी यावेळी केली. यावेळी बाबरी मुंडे, संजय आंधळे, राजाभाऊ पवार आदी उपस्थित होते.