आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.७:झाडावर झोका बांधून निवांत झोप घेण्याच्या नादात झाडाच्या फांदीवरील झोकाच तुटल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना अक्षय तुतीयेच्या दिवशी मंगळवारी पहाटे निमखेडी ता.सोयगाव शिवारातील शेतात उघडकीस आली आहे.सोमवारी रात्रीच तरुणाने झाडावर झोका बांधण्याचा प्रयत्न केला असता झोका तुटून कोसळल्याने झाडावरील झोक्यात असलेल्या तरुणाला मेंदूला मार लागून त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किशोर बाबूलाल तडवी(वय ४५ रा.कडेवडगाव ता.पाचोरा)असे मृत तरुणाचे नाव आहे.निमखेडी शिवार पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे या गावालाच लागून आहे.
मृत तरुण मोटारसायकल वरून निमखेडी ता.सोयगाव शिवारातील शेतात येवून त्या शेतातील बांधावर असलेल्या निंबाच्या झाडाला उंचावर झोका बांधून झोपण्याच्या नादात झोका तुटल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.दरम्यान मंगळवारी पहाटे गुराख्यांना शेतात या तरुणाचा मृतदेह आढळल्याने निमखेडी ता.सोयगाव शिवारात खळबळ उडाली होती.घटनास्थळी निमखेडी गावचे पोलीस पाटील भगवान पाटील,वडगावकडे पोलीस पाटील सुनील कांटे आदींनी धाव घेत पोलिसांना घटनेची माहिती दिल्यावरून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.