बीड : पंकजाताई मुंडे यांचा १० व ११ मे रोजी जिल्हयात दुष्काळ दौरा ; चारा छावण्या, टंचाईग्रस्त गावांना भेटी

दुष्काळग्रस्त शेतकरी, नागरिकांशी साधणार संवाद

बीड दि.०८:आठवडा विशेष टीम― जिल्हयातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेता राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे हया येत्या १० व ११ मे रोजी जिल्हयाचा दुष्काळी दौरा करणार आहेत. या दौ-यात चारा छावण्यांना भेटी तसेच शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडी अडचणी त्या जाणून घेणार आहेत, तीव्र पाणी टंचाई असणा-या गावांनाही त्या भेटी देणार आहेत.

मागील वर्षीपेक्षाही यंदा जिल्हयात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. जनावरांच्या चा-यासोबतच पाणी टंचाईची स्थिती देखील तेवढीच भयानक आहे. नदी, नाले व धरणं कोरडेठाक पडल्याने जनतेपुढे पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे, अशा परिस्थितीत त्यांना शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करून दिलासा देण्यासाठी पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे हा दौरा करणार आहेत.

येत्या शुक्रवारी गेवराई पासून त्यांचा हा दौरा सुरू होणार आहे. १० मे रोजी सकाळी ९ वा. गेवराई शहरातील चारा छावणीला भेट, सकाळी १०.३० वा. मादळमोही, सकाळी ११.३० वा तिंतरवणी, दुपारी १२.३० वा. खोकरमोहा ता. शिरूर, बीड तालुक्यात दुपारी २.३० वा तळेगांव, ३.३० वा. आहेरवडगांव पाली, दुपारी ४.३० वा. मांजरसुंबा, सायंकाळी ५.३० वा. चौसाळा तर संध्याकाळी ६.३० वा. त्या अंबाजोगाई तालुक्यातील दैठणा राडी येथे जाऊन पाणी टंचाईची स्थिती जाणून घेण्यासाठी गावांस भेट देणार आहेत.

११ मे रोजी सकाळी १० ते दुपारी २ वा. दरम्यान ना. पंकजाताई मुंडे हया परळी तालुक्यातील धारावती तांडा, रेवली तांडा
वाका, गोवर्धन, सिरसाळा येथे टंचाई ग्रस्त गावांना भेटी देणार असून दुपारी ३ वा. वडवणी येथे चारा छावण्यांना भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधणार आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.