अंबाजोगाई (प्रतिनिधी): आपल्या मुलांना आयुर्वेदिक विधीने निरोगी व सशक्त बनवण्यासाठी तसेच आजची लहान बालके ही देशाचे भविष्य आहेत म्हणून त्यांना शारीरीक,मानसिक, बौद्धिक रुपाने सुदृढ बनवण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी श्री.संत भगवान बाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित गोरक्षण शाळा वरवटी व जनमित्र सेवा संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार,दि.11 मे रोजी आरोग्य कल्प संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आयुर्वेदमध्ये नमुद असलेल्या प्राचीन ग्रंथ ‘काश्यप संहिता’ मध्ये आरोग्य कल्प बाबतीत वर्णन केलेले आहे. आरोग्य कल्प हे सुवर्ण, तुप गोमूत्र अर्क व मधाचे उत्तम मिश्रण आहे हे पिणे अथवा खाणे अतिशय योग्य असते.याद्वारे बाल चिकित्सा या आयुर्वेदाच्या माध्यमातून करता येतात.आरोग्य कल्प हे लहान मुलांच्या भविष्यासाठी एक आयुर्वेदीक वरदान आहे.पंचगव्य सिद्ध डॉ.दिलीप कुलकर्णी यांच्या उपस्थिती मध्ये गोरक्षण शाळा वरवटी, (ता.अंबाजोगाई,जि. बीड) यांच्या मार्फत शनिवार,11 मे रोजी वय वर्षे 0 ते 16 वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना प्रत्येक महिन्याच्या पुष्य मुहूर्तावर आरोग्य कल्प दिले जाईल.या महिन्यात पुष्य नक्षत्र हे दिनांक 11 मे 2019 वार शनिवार रोजी येत आहे.या मुहूर्तावर आयुर्वेदात ऋषी मुनींनी केलेल्या कथानानुसार ‘आरोग्य कल्प’ म्हणजे लहान मुलांतील रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे तसेच सर्वांगीण विकास करणे हे आहे. आरोग्यकल्प मुळे लहान मुलांमधील आकलन शक्ती चा विकास होतो, लहान मुलांमधील सर्दी, थंडी,ताप अशा सर्व आजारांपासून वाचवते, लहान मुलांमध्ये असलेले पचनक्रिया व्यवस्थित राहावी यासाठी सह कार्य करते, एंटीबायोटिक्स ने होणार्या दुष्परिणाम पासून बचाव करते, लहान मुलांच्या समरणशक्ती व बुद्धी कौशल्य वाढविण्याचे कार्य करते,लहान मुलांमध्ये उत्साह,स्फूर्ती व चंचलता वाढविण्याचे तसेच चिडचिडेपणा,आळस, नैराश्य असे मानसिक आजार दूर करण्याचे कार्य करते.आपल्या अंबाजोगाई शहरात व परिसरात प्रथमच अशा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून आपणास जिथे सोईस्कर असेल तिथे आपल्या पाल्याला आठवणीने या आरोग्य कल्पचा डोस पाजावा असे आवाहन गोरक्षण शाळा वरवटी व जनमित्र सेवा संघ पुणे यांच्या वतीने करण्यात येत आहे.शनिवार,दि. 11 मे रोजी गोरक्षण शाळा वरवटी, ता अंबाजोगाई येथे सकाळी 8 ते सकाळी 10 वा.तसेच शंकर महाराज वंजारी वसतिगृह अंबाजोगाई येथे संध्याकाळी 6 ते रात्री 8 वा.‘आरोग्य कल्पचा’ डोस दिला जाईल हा डोस मोफत असून तो नियमितपणे देण्यात येईल अशी माहिती अॅड.अशोक मुंडे व डॉ.अपूर्वा सावंत यांनी दिली आहे.