केज :आठवडा विशेष टीम― 2007 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरणात अखेर अंनिस चे बीड जिल्हा कार्यकर्ते हनुमंत भोसले यांच्यावर संत आसाराम बापू सह इतर कांही स्वयंघोषित संत व राजकीय लोकांवर टीका केल्याच्या आरोपातून अंबेजोगाई तालुका कनिष्ठ न्यायालयाने काल गुरुवारी निर्दोष मुक्तता केली.
2007 मध्ये अंबेजोगाई येथे येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेद्वारे आयोजित दोन दिवसीय वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थी व शिक्षकांसाठी व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी समारोपाच्या कार्यक्रमात तत्कालीन महाराष्ट अंनिस चे बीड जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत भोसले यांचे चमत्काराच्या प्रयोगासह व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रयोगासह अनेक भोंदू बाबा व महाराजाबद्दल आपले सडेतोड विचार मांडले होते. विशेष म्हणजे उपस्थित विद्यार्थ्यानी हनुमंत भोसले यांच्या नावापुढे दोन दिवसीय शिबिरातील सर्वोत्तम वक्ता अशा लेखी प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी फिर्यादी प्राचार्या सुनीता महाजन यांनी हनुमंत भोसले यांच्या भाषणाने आपल्या भावना दुखावल्याची फिर्याद अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. यामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा व महाराष्ट्रात याचे प्रतिसाद उमटले होते. या प्रकरणाची तीव्रता पाहून प्रशासनाने डॉ नरेंद्र दाभोळकरांना बीड जिल्हा बंदी केली होती. विधानसभेतही कांही आमदारांनी विशेष औचित्याचा मुद्दा म्हणून हे प्रकरण उचलले होते.
गेली अनेक वर्षे हे प्रकरण अंबेजोगाईच्या तालुका स्तरीय कनिष्ठ न्यायालयात न्यायप्रविष्ठ होते. फिर्यादीच्या वतीने पाच साक्षीदारांची साक्ष झाली. फिर्यादी पक्ष आपले आरोप सिद्ध न करू शकल्याने अखेर न्यायालयाने केजचे सामाजिक कार्यकर्ते व बीड जिल्हा अंनिस चे जेष्ठ कार्यकर्ते हनुमंत भोसले यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. हा निकाल म्हणजे सत्याचा विजय असून यापुढे बीड जिल्ह्यातील अंधश्रद्धा व भोंदूगिरी विरोधात जोमाने कार्य करणार असल्याची प्रतिक्रिया हनुमंत भोसले यांनी दिली. हनुमंत भोसले यांच्या वतीने प्रसिद्ध व जेष्ठ विधिज्ञ ऍड माधव जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम पाहिले. या निकालानंतर ऍड माधव जाधव व सहकाऱ्याचे अंनिस अंबेजोगाई शाखेच्या वतीने विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.