Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 11 : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने देशभरात आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. राज्यात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला असून राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज्यभर समूह राष्ट्रगीत गायन होणार आहे.
राज्यातील खाजगी, शासकीय आणि इतर सर्व प्रकारच्या शाळा/महाविद्यालये/शैक्षणिक संस्था/विद्यापीठे यामधील विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सहभाग असेल. सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल आणि सकाळी 11 ते 11.01 मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अनिवार्य असेल. समूह राष्ट्रगीताच्या वेळी राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक असून याबाबत नागरिकांमध्ये सर्व स्तरावर जाणीव जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.
खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था,शासकीय व निम शासकीय कार्यालये, केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभागी होणे आवश्यक राहील. शाळा/महाविद्यालये/शैक्षणिक संस्था/विद्यापीठे यामधील विद्यार्थ्यांना अगोदरच माहिती देणे आवश्यक आहे. सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था/शासकीय आणि निम शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदर उपक्रमात सहभागी होणे अनिवार्य असल्याचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
००००